| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ईशान्य भारतातील राज्यांमध्ये सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि पुरात 26 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती रविवारी (दि.1) प्रशासनाने दिली. मिझोराममध्ये भूस्खलन, 13 घरे कोसळली आहेत. सिक्कीममध्ये 1500 पर्यटक अडकले असून, पूरबाधित राज्यांमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य सुरु आहे.
ईशान्य भारतातील आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तीन राज्यांत मागील दोन दिवसांमध्ये 26 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममध्ये भूस्खलन आणि पुरामुळे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. अरुणाचल प्रदेशच्या पूर्व कामेंग जिल्ह्यातील बाना-सेप्पा रोडवरील राष्ट्रीय महामार्ग 13 वर भूस्खलनामुळे एक कार खोल खड्ड्यात पडली. या दुर्घटनेत दोन कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला. दुसर्या एका घटनेत दोन जणांना आपला जीव गमवावा लागला. मिझोरामच्या सेरछिपमध्ये 13 घरे कोसळली. एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पुढील काही दिवसांत या परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर सिक्कीममध्ये सुमारे 1500 पर्यटक अडकले आहेत.
आसाममध्ये एकूण 17 जिल्हे पूर आणि भूस्खलनाने बाधित झाले आहेत आणि 78,000 हून अधिक लोक बाधित झाले आहेत. 1,200 हून अधिक जणांनी पाच वेगवेगळ्या मदत शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. लखीमपूर जिल्हा सर्वाधिक प्रभावित झाला आहे आणि 41,600 हून अधिक नागरिकांना फटका बसला आहे. पूरग्रस्त आसाममध्ये एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. अरुणाचल प्रदेशातही मदत आणि बचाव कार्य सुरू आहे, प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग नुकसानीचे मूल्यांकन करत आहे आणि बाधित कुटुंबांना त्वरित मदत पुरवत आहे. आसामची राजधानी गुवाहाटीत पुरामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. गोलाघाटमध्ये दोन आणि लखीमपूरमध्ये एकाचा समावेश आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसांत या प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी आसामच्या काही भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत. उर्वरित ईशान्य भारतातील राज्यांसाठी प्रदेशासाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे.