वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी त्रस्त
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग-पेण मार्गावरील अलिबाग-वडखळ रस्त्यावर रविवारी (दि.01) सायंकाळी वाहतूक कोंडी झाली. अपुर्या रस्त्याचा फटका पर्यटकांसह प्रवाशांना बसला. ही वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली.
शनिवार व रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल झाले होते. रविवारी दुपारनंतर पर्यटक परतीच्या मार्गावर निघाले. तसेच उन्हाळी सुट्टीत गावी आलेले पर्यटकही रविवारी दुपारी निघाले. अलिबागहून पेणमार्गे आपल्या खासगी वाहनाने प्रवासी व पर्यटक जात असताना तिनविरापासून पेझारी चेक पोस्टच्या दरम्यान वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. अलिबागबरोबरच रेवस, मांडवा येथून येणार्या वाहनांची गर्दी वाढल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचे समोर आले आहे. अलिबाग-पेण मार्गावरील रस्ता अरुंद आहे. वाहनांची संख्यादेखील प्रचंड वाढली आहे. या वाढत्या वाहनांमुळे अलिबाग-वडखळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. तीस मिनीटाच्या आत पेझारीपर्यंत जाणार्या गाड्यांना पंधरा ते वीस मिनीट उशीर झाला. या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाले. ही वाहतूक कोंडी सोडवितांना प्रवाशांची दमछाक झाली.