। पुणे । प्रतिनिधी ।
पुणे लष्कर भागात भिक्षेकऱ्याला मारहाण करुन त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या झालेल्या भिक्षेकऱ्याची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी एकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
लष्कर भागातील नेहरु मेमाेरिअल हाॅलसमोरील पदपथावर रात्री भिक्षेकरी झोपतात. हत्या झालेल्या भिक्षेकऱ्याचे वय अंदाजे 60 वर्ष असून तोही तेथे झोपायचा. त्याच्यासोबत आणखी एक भिक्षेकरी झोपायचा. गुरुवारी (दि. 23) पहाटे दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर भिक्षेकऱ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत भिक्षेकरी गंभीर जखमी झाला. त्यानंतर सकाळी पदपथावर भिक्षेकरी मृतावस्थेत सापडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हत्या करुन पसार झालेल्या आरोपीचा शोध पोलीस करीत आहेत.