वावे येथील कमलाकर गायकर यांचे निधन
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वावे येथील कमलाकर जानू गायकर यांचे गुरुवारी (दि. 23) सकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 101 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. वावे-रामराज विभागातील शेतकरी कामगार पक्षाचा निष्ठावंत ज्येष्ठ नेता हरपल्याचे दुःख अनेकांनी व्यक्त केले.
अलिबाग तालुक्यातील वावे येथील कमलाकर गायकर यांनी तरुण वयापासूनच शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा हाती घेऊन पक्ष वाढीसाठी काम केले आहे. रायगडचे भाग्यविधाते शेतकर्यांचे कैवारी रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. प्रभाकर पाटील यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे. बेलोशी ग्रामपंचायतीच्या सदस्यपासून उपसरपंच म्हणून त्यांनी भूमिका बजावली आहे. त्या कालावधीत त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. बेलोशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
रेवदंडा विभाग सहकारी भात गिरणी मर्यादीत बापळे – फणसापूरचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून पाच वर्षे सेवा केली आहे. बेलोशी येथील लोकनेते अॅड. दत्ता पाटील हायस्कूलचे सदस्य ते व्हाईस चेअरमन म्हणून काम केले आहे. दारुमुळे कुटूंब उध्वस्त होऊ नये यासाठी त्यांनी दारूबंदीसाठीदेखील पावले उचलली आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत दारुबंदी मोहिमेला पोषक कार्य केल्याबद्दल त्यांना दारुबंदी संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते.
बेलोशी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने विविध कार्यकारी सेवा संस्था विशेष प्रोत्साह पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. राजकिय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार अशा सर्वच क्षेत्रात काम करीत असताना सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी ते कायमच कटीबध्द राहिले आहेत.
गुरुवारी सकाळी राहत्या घरी कमलाकर गायकर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. वावे येथील स्मशानभूमीमध्ये दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकापचे ज्येष्ठ नेते तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य द्वारकानाथ नाईक, शेकाप अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील, गजानन पाटील, सदानंद थळे, अनंत पाटील, पांडूरंग ठाकूर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ, नातेवाईक मित्रमंडळींनी उपस्थित राहून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.