प्रशासकिय अधिकार्यांचे पंचनाम्यावर पंचनामे, ग्रामस्थ हतबल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मिळकतखार बेकायदेशीर भराव प्रकरणी जमिनीचे मालक वरुण गोविंद वासवानी, मोहित जनक वासवानी व रवी हरकीसन वासवानी यांच्या कंपनीविरोधात तिसर्यांदा गुन्हा दाखल झाला आहे. गेले कित्येक महिने तक्रारी, आंदोलन, आत्मदहन करुनही प्रशासन कारवाई न करता केवळ पंचनाम्यावर पंचनामे करीत असल्यामुळे ग्रामस्थ हतबल झाले आहेत. परिणामी, प्रशासकिय अधिकारी आर्थिक हितसंबंध जोपासत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.
बेकायदेशीर जेएसडब्ल्यू कंपनीची स्लॅग टाकून भरव करणार्या वासवानी कंपनीविरोधात तिसर्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे असतानाही मांडवा सागरी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असणार्या मिळकतखार खाडीमध्ये वासवानी कंपनीतर्फे पुन्हा जोरदार बेकायदा भराव सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी किती हप्ता घेतला, यावरही जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.
मिळकतखार येथील कांदळवन क्षेत्र, पाणथळ जागा, सीआरझेड क्षेत्र, ना-विकास क्षेत्र यामध्ये मातीभराव करण्यास कायद्याने गुन्हा असूनही या जागेत बेकायदेशीर भराव रात्रभर सुरू झाला असून स्थानिक ग्रामस्थ या सर्व प्रकाराने भयभीत झाले आहेत. माती घेवून येणारे डंपर रात्रभर फेर्या मारत असून या डंपरचे वाहन चालक नशा करून गाड्या चालवित असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
याशिवाय वाहतूक पोलीस बेकायदा भराव घेऊन येणार्या गाड्यांची तपासणी का करीत नाही, त्यांच्याकडून दंड आकारणी होते का, वाहतूकीची परवानगी आहे कि नाही, याबाबत तपास करतात क? असे प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे याबाबत 2014, 2022 नंतर आता 2025 मध्ये गु.र.क्र. 2/2025 अन्वये मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तिसर्यांदा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होवूनही हा भराव बेकायदेशिररित्या वारंवार सुरूच आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन नागरिकांच्या नाही तर धनदांडग्यांच्या सेवेसाठी काम करीत असल्याची टीका ग्रामस्थांनी केले आहे. या ठिकाणी पूर्वी औष्णीक प्रकल्पातील घातक स्लॅगचा वापर करण्यात आला होता. आता ही राख लपविण्यासाठी त्यावर लाल माती टाकण्यात येत असल्याचे पुरावे ग्रामस्थांनी सादर केले आहेत. शनिवार व रविवार दोन सुट्टीचे दिवस असल्याने सरकारी कार्यालये बंद असणार हे माहिती असल्याने या माफीयांनी भरावाचे काम पुन्हा जोरदार सुरू केले आहे. सारळचे मंडळ अधिकारील नलिनी हरिश्चंद्र पाटील यांनी पोलीस ठाण्यात हजर राहून सरकारतर्फे फिर्याद लिहून दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनूसार, उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्याकडील लेखी आदेशाने मांडवा सागरी पोलीस ठाण्यात हजर राहुन फिर्याद नोंदविण्यास सांगितल्याने पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
विना परवाना भराव
मिळकतखारमध्ये सुरु असलेल्या भरावाबाबत जमीनमालक यांनी काणेतीही सक्षम प्रधिककरणाची परवानगी घेतलेली नाही. हा भराव सीआरझेड क्षेत्रालगत केल्याचे दिसून येत आहे. भरावाच्या पुर्व बाजूस तुरळक प्रमाणात कांदळवनाच्या प्रजाती तसेच लगत चिखल माती दिसून येते.
अखेर 1 महिन्यानंतर गुन्हा दाखल
या जागेचे सध्याचे मालक वरूण गोविंद वासवानी, मोहित जनक वासवानी व रवि हरकिसन वासवानी यांनी दिनांक 5 डिसेंबर 2024 ते दिनांक 10 डिसेंबर 24 रोजी दरम्यान कांदळवन क्षेत्रालगत स्लॅगचा भराव केल्याने त्या ठिकाणी असणारे कांदळवनही नष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 15 नुसार व महाराष्ट्र प्रादेशीक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 52,53,54,55,56 व 57 प्रमाणे गुन्हा केल्याबाबत सरकारतर्फे वरूण वासवानी, मोहित वासवानी व रवि हरकिसन वासवानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेएसडब्ल्यूची राख जातेय कुठे?
मिळकतखारमधील वासवानी कंपनीच्या जागेत जेएसडब्ल्यू कंपनीमधील टाकाऊ स्लॅगचा भराव केलेला दिसुन आल्याचे मंडळ अधिकारी नलिनी पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय नलिनी पाटील यांनी दिलेल्या माहितीत मिळखतखार येथील सर्वे नं. 47/1 (जुना गट नं. 369 पैकी) खासगी मालकीच्या मिळकतीमध्ये रेवस-सारळ रस्त्याजवळील समुद्रकिनार्याच्या रस्त्यालगत भराव टाकण्यात आला असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत चौकशी केली असता वासवानी यांच्या मालकी जागेत भराव टाकल्याचे दिसुन आले. भरावालगत नैसर्गिक नालाप्रवाह असुन नाल्याजवळ मिसवाक, कंरजवेल, कांदळवन प्रजाती आहेत, असेही सांगण्यात आले. त्यामुळे मिळकतखारमध्ये होणारा भराव हा जेएसडब्ल्यू कंपनीचाच स्लॅग असल्याचे सिद्ध झाले आहे.
जेएसडब्ल्यूची राख जातेय कुठे?
मिळकतखारमधील वासवानी कंपनीच्या जागेत जेएसडब्ल्यू कंपनीमधील टाकाऊ स्लॅगचा भराव केलेला दिसुन आल्याचे मंडळ अधिकारी नलिनी पाटील यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याशिवाय नलिनी पाटील यांनी दिलेल्या माहितीत मिळखतखार येथील सर्वे नं. 47/1 (जुना गट नं. 369 पैकी) खासगी मालकीच्या मिळकतीमध्ये रेवस-सारळ रस्त्याजवळील समुद्रकिनार्याच्या रस्त्यालगत भराव टाकण्यात आला असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत चौकशी केली असता वासवानी यांच्या मालकी जागेत भराव टाकल्याचे दिसुन आले. भरावालगत नैसर्गिक नालाप्रवाह असुन नाल्याजवळ मिसवाक, कंरजवेल, कांदळवन प्रजाती आहेत, असेही सांगण्यात आले. त्यामुळे मिळकतखारमध्ये होणारा भराव हा जेएसडब्ल्यू कंपनीचाच स्लॅग असल्याचे सिद्ध झाले आहे.