। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील चरी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (दि.21) शेतकर्यांशी चर्चा करून हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. चरी गावाच्या हद्दीत असलेल्या एमआरडीएच्या जागेत स्मारक उभे करण्याचा मानस असून त्यासाठी पाच कोटी रुपयांची आवश्यकता आहे, यासाठी प्रयत्न केले जातील, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
अलिबागमधील तुषार रेस्ट हाऊस येथील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांचे आजोबा नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली 1932 ते 1939 या कालावधीत खोतांविरोधात चरीचा संप झाला. या संपात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान राहिले आहे. कसेल त्याची जमीन हा कायदा पारीत करण्यात आला होता. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ठिकाणी भेट दिली. त्या वास्तूंच्या ठिकाणी स्मारक उभारण्याबरोबरच त्याठिकाणी वाचनालय, व इतर सुविधा उपलब्ध करून पर्यटन वाढीला चालना देणे. महामानवाचे विचार तरुण पिढीपर्यंत रुजविण्याच्या दृष्टीने हा प्रयत्न केला आहे. परंतु या ठिकाणी जागेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो प्रश्न सोडविण्यासाठी चरी गावातील ग्रामस्थांसोबत चर्चा केली. या प्रकल्पासाठी एक एकर जागेची आवश्यकता आहे. त्यामुळे गावाच्या हद्दीत अलिबाग -वडखळ रस्त्याच्या बाजूला एमएमआरडीएची जागा उपलब्ध आहे. त्याठिकाणी स्मारक उभे करण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. वाचनालय, सभागृह व इतर सुविधा उपलब्ध याठिकाणी करण्याचा मानस आहे, असे आठवले म्हणाले.
आतंरजातीय विवाहाच्या माध्यमातून दोन समाजाला एकत्र आणण्याचे काम सामाजिक न्याय विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आंतरजातीय विवाह करणार्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. शासनाकडून निधी उपलब्ध केला जातो. परंतु केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध झाला नसेल, तर तो निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथील सामाजिक न्याय भवन इमारतीबाबत संबंधित विभागातील अधिकार्यांशी चर्चा करून तो प्रश्न सोडविण्यात येईल. पिडीतांना न्याय देण्यासाठी अॅट्रोसिटीचे खटले जलद न्यायालयात पाठविण्याची मागणी शासनाकडे केली जाईल, असेही रामदास आठवले यांनी सांगितले.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माझे आजोबा नारायण नागू पाटील यांच्या नेतृत्वाखाली चरीचा संप झाला. सावकाराविरोधातील हा देशातील पहिला मोठा शेतकर्यांचा संप आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकर्यांच्या बाजूने वकीलपत्र घेतले होते. त्यांचे चरीला येणे होते. त्यामुळे त्यांचे स्मारक होणे आवश्यक आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे ही मागणी केली असून केंद्राने हे स्मारक उभारण्यासाठी सहकार्य करावे असे त्यांना सांगण्यात आले आहे.
जयंत पाटील, सरचिटणीस
शेतकरी कामगार पक्ष