| अलिबाग | प्रतिनिधी |
आयुष्यात सतत शिकत राहणे, व्यक्तिमत्व विकास करत राहणे हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असा गुरूमंत्र राज्याच्या माजी पोलीस महासंचालक मिरा बोरवणकर यांनी अलिबाग परिसरातील युवकांना दिला आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजीक हेल्थ आणि आवाहन ठाणे यांच्या सहयोगाने विद्यासान एज्युकेशनल फाऊंडेशन अलिबाग आयोजित ‘वेध-2025′ हा कार्यक्रम अलिबागमधील आरसीएफ कर्मचारी वसाहतीमध्ये रविवारी (दि.19) घेण्यात आला होता. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमात भूतपूर्व आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर, ‘चला हवा येऊ द्या’चे पत्रलेखक अरविंद जगताप, मायक्रोसॉफ्टचे डायरेक्टर चिन्मय गवाणकर, एकल प्रवासी आभा चौबळ यांसह डिझाईन जत्रा या आगळ्या सामाजिक-स्थापत्य संस्थेच्या वास्तुविशारद विनिता कौर एम. चिरागिया, प्रतीक धानमेर, शार्दुल पाटील यांच्या मुलाखती डॉ. आनंद नाडकर्णी यांनी घेतल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आभा चौबळ यांनी त्यांच्या एकल प्रवासातील रोमांचक अनुभवांचे कथन केले. चिन्मय गवाणकर यांनी येणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता युगातील आव्हाने आणि संधी यांचा सविस्तर उहापोह केला. तसेच, मिरा बोरवणकर यांनी त्यांच्या दिलखुलास मुलाखतीतून उपस्थितांची मने जिंकली. शाळेपासून सेवानिवृत्ती पर्यंतचा आव्हानांनी भरलेला त्यांचा जीवनप्रवास मोकळेपणाने मांडला. त्यांनी सभागृहात बहुसंख्येने उपस्थित युवा वर्गाला मार्गदर्शन केले. तसेच, आयुष्यात येणाऱ्या संकटांनी खचून न जाता आव्हाने मानून त्यांना सामोरे गेलात तर यश निश्चित मिळते, असे सांगीतले.
यावेळी, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आरसीएफचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे या मान्यवरांसह अलिबागचे संचालक डॉ. राजीव धामणकर, डॉ. रिटा धामणकर, विद्या पाटील आणि अलिबाग परिसरातील बहुसंख्य शालेय विद्यार्थी, सुजाण नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
अरविंद जगताप यांच्या मुलाखतीने सांगता
संवेदनशील साहित्यिक अरविंद जगताप यांच्या मुलाखतीने वेध संमेलनाची सांगता झाली. बीड येथील अभावग्रस्त बालपणापासून ते मुंबई पुण्यातील सिनेमा मालिकांचे प्रतिथयश लेखक इथपर्यंतच्या प्रवासाचे जगताप यांनी कथन करताना कधी उपस्थितांना खळाळून हसवले, तर कधी अंतर्मुख करत भावविभोर केले. यादरम्यान, त्यांनी त्यांच्या पुस्तकातील बापमाणूस या लालित्यपूर्ण लेखाचे वाचन केले.