| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ रेल्वे स्थानकात मध्यरात्री अडीच वाजता ऑन ड्युटी होमगार्ड यांच्याकडून लहान मुलाला चालत्या गाडीत चढवून त्या मुलाच्या पालकांची शेळू स्थानकात भेट घडवून दिली. मध्यरात्री अडीच वाजता ड्युटीवर असलेल्या होमगार्ड अधिकारी आणि शिपाई यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.दरम्यान, रेल्वे स्थानकातील सीसीटिव्ही कॅमेरे पाहिल्यानंतर होमगार्ड यांच्या कामगिरीचे कौतुक होऊ लागले आहे.
नेरळ रेल्वे स्थानकात रात्रपाळी करीता रेल्वे स्टेशन येथे कर्तव्यावर हजर असलेले होमगार्ड अधिकारी राहुल अरुण पाटील, कर्मचारी बबन चिंधू भागीत, अनंता डायरे, रात्रपाळी मध्ये ट्रेन पेट्रोलिंग कर्तव्यावर आलेले होमगार्ड अधिकारी राजा नजे हे मध्यरात्री 2:49 वाजता कर्जनहून सीएसएमटी कडे जाणारी लोकल मध्ये माथेरान येथून आलेले पाच ते सहा प्रवासी मुंबई कडे जाणारी लोकल पकडत होते. त्यावेळी त्या प्रवाशांनी लोकल मध्ये चढताना डब्ब्यांची अदलाबदल केली. त्यात त्यात त्यांच्याकडील 13 वर्षाचा लहान मुलगा हा फलाटावरच राहिला. त्याची माहिती त्या प्रवाशांना नव्हती, मात्र लोकल सुरू झाली असता होमगार्ड यांना त्या मुलाचे रडणे ऐकताच तिघांनी त्या मुलाला उचलले आणि चालत्या लोकलमध्ये त्यापैकी एक होमगार्ड चढला आणि पुढील प्रवास सुरू झाला. नेरळ पुढे असलेल्या शेळु स्थानकात होमगार्ड यांनी त्या लहान मुलाला त्यांचे पालक यांच्या हवाली सुखरूप केले. त्यावेळी ते प्रवासी आपला मुलगा नेरळ स्थानकात राहिला म्हणून खूप घाबरलेले होते, परंतु शेलू स्थानकात तो मुलगा पाहताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास ठेवला. होमगार्ड यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.