499 नागरिकांना आर्थिक मदतीची प्रतीक्षा
| रायगड | आविष्कार देसाई |
जिल्ह्यात जुलै महिन्यामध्ये आपत्ती कोसळीली होती. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली होती. हाहाकार उडालेला असताना सरकारने आर्थिक मदतीचा हात दिला. मात्र, अद्यापही 499 आपद्ग्रस्त मदतीपासून वंचित असल्याचे उपलब्ध आकडेवारीवरुन समोर आले आहे. सरकारकडून आर्थिक मदत दिली गेली, मात्र प्रशासकीय पातळीवरुन ती थेट लाभार्थ्यांच्या खिशात पडायला उशीर होत असल्याने आपद्ग्रस्तांची परवड होत असल्याचे चित्र आहे.
यंदा मान्सून फारच उशिराने दाखल झाला होता. मात्र, त्यानंतर त्याने जिल्ह्यात चांगलाच जोर धरला होता. जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरु झालेला पाऊस काही अपवाद वगळता जुलै महिन्यात छप्परफाड बरसला. या कालावधीत नद्या, नाले दुथडी भरून वाहत होते. काही ठिकाणी दरडी पडण्याच्या घटना घडल्या. इर्शाळवाडीवर तर दुःखाचा डोंगर कोसळला होता. 27 जणांना प्राण गमवावा लागला होता. तर 57 जण अद्यापही बेपत्ता आहेत.
आपत्तीमध्ये सापडलेल्यांना तातडीने मदत करण्यासाठी सरकारने निधी जिल्हा प्रशासनाकडे दिला. मात्र, मदत वाटप करताना प्रशासनाच्या यादीत अद्यापही 499 आपद्ग्रस्त मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना तातडीने आर्थिक मदत झाल्यास त्यांची सुरु असलेली परवड थांबणार आहे. परंतु, प्रशासकीय यंत्रणेमार्फत अद्याप मदत पोहोचलेली नसल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते.
जुन-जुलै 2023 या कालावधी आलेल्या आपत्तीमुळे तब्बल पाच हजार 905 नागरिक बाधित झाले. पैकी पाच हजार 594 नागरिकच मदतीसाठी पात्र ठरले आहेत. सरकारने तब्बल 54 लाख 56 हजार रुपये जिल्हा प्रशासनाकडे दिले. त्यातील 18 लाख 65 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. अद्याप 15 लाख 65 हजार रुपयांची आर्थिक मदत वाटप करण्यात आलेले नाही. सरकारने नागरिकांना तातडीने मदत मिळावी म्हणून आर्थिक मदत दिली आहे. मात्र प्रशासकीय पातळवरुन ती मदत पोहोचण्यात उशीर होत आहे.
दरम्यान, वारस पंचनामा तसेच वारसांचे संमतीपत्र घेण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. मृत व्यक्तींच्या कुटूंबाना सहाय आणि जखमींना मदत करणे, तसचे निवारा केंद्रातील नागरिकांना अन्न, वस्त्र औषध पुरवण्यासाठी अधिक प्रमाणात रक्कम खर्च झाली आहे. मदत देण्याबाबत उशीर होण्यामागची अन्य काही कारणे असल्यास तीदेखील तपासण्यात येतील. सरकारकडून आलेली मदत आपद्ग्रस्तांपर्यंत देण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही.
संदेश शिर्के, निवासी उपजिल्हाधिकारी, रायगड