जि.प. सीईओ डॉ. बास्टेवाड यांचे आवाहन
। रायगड । खास प्रतिनिधी ।
‘माझी माती, माझा देश’ उपक्रमाचा प्रारंभ 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून होत आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व कार्यालयात ‘पंचप्राण शपथ’ कार्यक्रम सकाळी 10 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे. जिल्ह्यात 9 ते 20 ऑगस्टदरम्यान, ‘माझी माती, माझा देश’ मोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर कार्यक्रम होणार आहेत. यात देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असून, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि लोकसहभागातून हे अभियान आयोजित करण्यात येत आहेत. पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 15 तालुक्यांतील 809 ग्रामपंचायतींमध्ये शिला फलक लावण्याचे काम सुरु आहे. तसेच 75 देशी वृक्षाची रोपे वन विभाग आणि सामाजिक वनिकरण विभागाकडून उपलब्ध करून घेण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात या शपथेचे वाचन प्रत्येक करण्यात येणार आहे. नागरीकांनीदेखील ‘माझी माती, माझा देश’ या कार्यक्रमात सहभागी होऊन माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेली सेल्फी https//merimaatimeradesh.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करावी तसेच देशाच्या विरांसाठी समर्पित या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. भरत बास्टेवाड यांनी केले आहे.