अमली पदार्थांच्या सेवनातून मित्राने केला मित्राचा खून

। पेण । प्रतिनिधी ।

पेण शहरातील फणसडोंगरी येथील रहिवासी बाळु सीताराम चुनारे यांचा मुलगा गणेश बाळु चुनारे (14) याची अज्ञात इसमाने हत्या केल्याची घटना शनिवारी (दि.11) घडली. याबाबतची फिर्याद पेण पोलीस ठाण्यात दाखल होताच पेण पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवित अवघ्या चार तासात गणेशची हत्या करणार्‍या अनिरूद्ध कदम (15) याला अटक करून त्याची रवानगी कर्जत येथील बाल सुधारगृहात केली आहे.

पेण फणसडोंगरी परिसरात अनेक वेळा पोलिसांकडून गांजा, चरस विकणार्‍यांविरूध्द कारवाई झालेली आहे. मात्र, आजही या परिसरात अमली पदार्थ विकले जात आहेत. त्यामुळेच फणस डोंगरी व पिर डोंगरी परिसरात अनेक अल्पवयीन मुले व्यसनाधिन झालेली पाहायला मिळत आहेत. गांजा, चरस, एमडी, या पदार्थांबरोबर आता अल्पवयीन मुले नेलपेंट, रिम्युव्हर, आयोडेक्स, पंचरचे सोल्यूशन, पेंट, ग्लू, ड्रायक्लिनिंगचे केमिकल, बॉण्ड, स्टिकफास्ट, फेविक्विक, गॅसोलिन, हेअरस्प्रे, डिओड्रंट, थिनर, पर्मनंट मार्कर आदी पदार्थांमध्ये अडकल्याचे चित्र दिसत असून एक प्रकारे येणारी पिढी पालकांच्या बेजबाबदारपणामुळे वाया जाण्याच्या मार्गावर आहे. याचेच जिवंत उदाहरण म्हणजे पेण कासार तळा साई मंदिर शेजारी झालेली गणेश बाळु चुनारे हत्या.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, गणेश चुनारे हा मुलगा आपल्या मित्रांसोबत बाहेर गेला होता. परंतू रात्री तो परत आला नाही. मात्र शनिवारी (दि.11) रोजी सकाळी त्याचा मृतदेह आंबेडकर शाळेजवळील झुडपात आढळला. परंतू, हत्या की आकस्मित मृत्यू याबाबत पोलीस चौकशी करीत होते. बाळु चुनारे यांच्या तक्रारीनुसार पेण पोलीस ठाण्यात अज्ञात इसामाविरुध्द गुन्हा नोंद केला. उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या देखरेखीखाली पेण पोलीस ठाणे अधिक तपास सुरू केला. महत्वाची बाब म्हणजे गणेश चुनारे याच्या मृत्यूने पुन्हा एकदा साई मंदीर परिसर चर्चेच्या गर्दीत सापडलेला आहे. सदरील गणेश याचा मृत्यू अकस्मित झाला आहे की, हत्या याबाबत उलट सुलट चर्चा पेण शहरात सुरु होती. पोलिसांच्या तपासात गणेशने आत्महत्या केली नसून त्याची व्यसनाधिनतेतून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला आणि त्या दिशेने तपासाची सूत्रे फिरवली. पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक संदीप बागूल यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून तपास यंत्रण सज्ज केली. फॉरेंसिक व्हॅन व श्‍वान पथकास पाचारण करून प्राथमिक तपास करण्यात आला. घटनास्थळावरील परिस्थिती जन्य पुराव्याचे आधारे व गणेशच्या संगतीत असणारे मित्र यांचा शोध घेउन सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेउन त्यास ताब्यात घेतले आहे. अनिरूद्धला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गणेशची ात्या केल्याचे कबुल केले. बॉण्ड (सोल्यूशन) या व्यसनाच्या आहारी जाऊन अनिरूध्द कदम याने गणेश चुणारे याच्यावर लाकडी राप्टरच्या सहाय्याने वार करून अनिरूध्द कदम फरार झाला होता. असे त्याने आपल्या कबुलीत म्हटले असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

कार्यान्वित केलेल्या विशेष पथकामध्ये शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज संकलन, फुटेज चेक, नाकेबंदी, आरोपीचे शोध, पंचनामा व पुरावे हस्तगत याप्रमाणे सपोनि निलेश राजपूत, मसपोनि अस्मिता पाटील, पोउपनि समद बेग, पोउपनि प्रतीक पोकळे, पोउपनि विक्रम नवरखेडे, सफौ भाग्यवान कांबळे, सफौ राजेश पाटील, पोहवा प्रकाश कोकरे, राजेंद्र भोनकर, संतोष जाधव, सागर खांडसकर, अजिंक्य म्हात्रे, सचिन व्हस्कोटी, सुशांत भोईर, पोना अमोल म्हात्रे, पोकॉ गोविंद तलवारे, संदिप शिंगाडे, अशांत सांगविकर आदींच्या समन्वयातून अवघ्या चार तासात आरोपीला गजाआड केले आहे.

पोलीस यंत्रणेचे हात अपुरे
पेण शहर ज्या प्रकारे झपाट्याने वाढत आहे त्या प्रकारे अनैतिक व अवैध धंद्यांनादेखील उधाण आलेले पहायला मिळत आहे. त्यातच पोलीस खात्याजवळ असलेले कमी मनुष्यबळ. यामुळे अवैध धंदे रोखण्यास पोलीस यंत्रणेला हात अपुरे पडत आहेत. फणस डोंगरी परिसरात स्थलांतरीत झालेल्या लोकांचे मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. परप्रांतियांचा लोंढादेखील वाढल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळेच अमली पदार्थदेखील डोंगरी परिसरात सहज उपलब्ध होत आहेत.
Exit mobile version