दांडगुरीच्या अक्षयच्या भूमिकेचेही कौतूक
| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये जागतिक प्रिमीअर,29 व्या कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये मुख्य स्पर्धेसाठी आणि 9 व्या अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये भारतीय चित्रपट स्पर्धेत अधिकृत निवड झालेल्या मनोज शिंदे दिग्दर्शीत वल्ली हा मराठी सिनेमा जागतिक स्तरावर प्रशंसा मिळवत आहे. यामधील सर्वोत्कृष्ट अभिनय पुरस्कारासाठी नामांकन मिळवलेल्या देवा गाडेकर आणि वर्षा सुनील अजित या दोन्ही प्रमुख कलाकारांबरोबच श्रीवर्धन तालुक्यातील शिरवणे येथे प्राथमिक शाळा दांडगुरी येथील रा.पा. दिवेकर शाळेत माध्यमिक व श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयात 12 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या व अभिनयाची आवड असलेला अक्षय काकडे याने या सिनेमात साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकेचेही कौतूक होत आहे.
वडील नामदेव काकडे हे श्रीवर्धन तालुक्यात 35 वर्ष तलाठी म्हणून कार्यरत असल्याने अक्षयची नाळ कोकणातल्या मातीशी,तिथल्या संस्कृतीशी अगदी घट्टपणे रोवली गेली आहे.त्यामुळे कोकण हि त्याची कर्मभूमी आहे असे म्हणावयास हरकत नाही. एका सर्व सामान्य कुटुंबातील अक्षयची या सिनेमात मुख्य मुख्य खलनायक भूमिका असलेला मराठी चित्रपट वल्ली यास ऑस्कर पात्र सिंगापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले ही श्रीवर्धनवासीयांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताच तो नाट्यक्षेत्राकडे वळला.त्याने संभाजीनगर येथे नाट्यशास्त्रात डिप्लोमा केल्यानंतर जालना घनसंगावी तालुक्यातील रामदास महाविद्यालयात थेटर आणि नाटकशास्त्र मध्ये पदवी पूर्ण केली.विविध राष्ट्रीय नामांकनामुळे सिनेमॅटिक प्रवासात एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरलेल्या वल्ली या सिनेमातील अक्षय काकडे याच्या भूमिकेचही कौतूक होत असून त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासासाठी कोकणातील नाट्य व चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांसह गावकऱ्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
