शाळेच्या समस्यांविषयी केली विचारणा
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील जि.प प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिलीचा वर्ग बंद करून त्याठिकाणी दुसऱ्या भागातील अंगणवाडीची मुले बसविली जातात व पहिलीच्या वर्गातील मुले इयत्ता दुसरीच्या वर्गात एकत्रित बसविली जातात. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मंगळवार, दि.22 रोजी आंबेवाडी शाळेमध्ये जमलेल्या ग्रामस्थांनी शाळेत आलेल्या गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांना यासंबंधी विचारणा करीत घेराव घातला.
याबाबत अंगणवाडी गेली 12 वर्षे ज्याठिकाणी भरविली जात होती, त्या ठिकाणी भरवावी किंवा या विद्यार्थ्यांकरिता दुसऱ्या वर्गाची सोय करावी व पूर्वीप्रमाणेच पहिलीचा वर्ग स्वतंत्र चालू ठेवावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेता येईल. या मागणीकरिता याबाबत सविस्तर वृत्त असे की, रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी येथील जि.प. शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे चार वर्ग असून, याठिकाणी आंबेवाडीची स्वतंत्र अंगणवाडीदेखील आहे. इयत्ता पहिलीमध्ये 16 दुसरीमध्ये 15, तिसरीमध्ये 13 व चौथीमध्ये 19 असे एकूण 63 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र वर्गखोली आहे. मात्र, चालू शैक्षणिक वर्षात आंबेवाडी येथील समर्थनगर येथे गेली 12 वर्षे सुरु असणारा अंगणवाडीचा वर्ग बंद करून यावर्षी आंबेवाडी जि.प. शाळेतील पहिलीच्या वर्गात भरविला जात आहे. त्यामुळे पहिलीच्या वर्गातील 16 विद्यार्थ्यांना इयत्ता दुसरीच्या वर्गात बसवून एकत्रित शिक्षण दिले जात आहे. पहिली व दुसरी असे एकूण 31 विद्यार्थी एकच वर्गखोलीत शिक्षण घेत असतील तर त्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार? दुसरीकडे भरणारा अंगणवाडीचा वर्ग आंबेवडील जि.प. शाळेतील पहिलीच्या वर्गात बसवून पहिलीच्या मुलांना दुसरीच्या मुलांसोबत बसवून एकत्रित शिक्षण कसे देणार? खासगी शाळांकडे पालकांचा ओढा असताना आम्ही आमच्या मुलांना जि.प. शाळेत शिकवित आहोत, ही आमची चूक आहे का? अगोदरच याठिकाणी आंबेवाडीची अंगणवाडी असताना, दुसऱ्या भागातील अंगणवाडी आमच्या पहिलीच्या वर्गात स्वतंत्रपणे का भरविली जाते, असे संतप्त सवाल ग्रामस्थांनी रोहा गटशिक्षण आधिकाऱ्यांना केले.
यावेळी महिला अधिक आक्रमक झाल्या होत्या. याबाबतीतील माहिती रोहा गटशिक्षण अधिकारी मेघना धायगुडे यांना विचारली असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले.