कडलूरमध्ये भीषण अपघात; नऊ जणांचा मृत्यू

। कडलूर। वृत्तसंस्था ।

तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यात बुधवारी (दि.24) रात्री उशिरा धक्कादायक घटना घडली आहे. तिरुचिरापल्लीहून चेन्नईच्या दिशेने जाणाऱ्या एका सरकारी बसचा टायर अचानक फुटल्याने भीषण अपघात झाला. टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली. समोरून येणाऱ्या दोन कारना या बसने इतक्या जोरात धडक दिली की, दोन्ही गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातात 9 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 4 जण गंभीर जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तामिळनाडू राज्य परिवहन महामंडळाची बस हायवेवरून वेगाने जात होती. अचानक बसचा टायर फुटला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. अनियंत्रित झालेली बस थेट डिव्हायडर तोडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये आली. यावेळी समोरून येणाऱ्या दोन कारना बसने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही कार बसच्या खाली अडकल्या गेल्या. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ सुरू झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला होता, तर दोघांनी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. जखमींमध्ये दोन चिमुरड्यांचाही समावेश असून, त्यांच्यावर सध्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच तित्ताकुडी आणि रामनाथम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने बसखाली अडकलेल्या गाड्या बाहेर काढण्यात आल्या. या अपघातामुळे चेन्नई-तिरुची नॅशनल हायवेवर कित्येक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रस्ता मोकळा करण्यात आला आणि वाहतूक पूर्ववत झाली.

Exit mobile version