जासई-गव्हाण रस्त्यावर चिखलाचा बसला थर

। उरण । वार्ताहर ।

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असणार्‍या जासई -गव्हाण रस्त्यावर सततच्या डेब्रिज व अवजड वाहनांच्या रहदारीमुळे पहिल्या पावसात रस्त्यावर चिखलाचा खच साचून खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पडलेल्या चिखलामुळे व खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची भीती वर्तविली जात आहे. या मार्गावर मुंबई परिसरातील डेब्रिज भरलेल्या वाहनांची रेलचेल सुरू आहे. जनतेच्या सोयीसाठी बनविण्यात आलेल्या रस्त्यावर मोठंमोठे खड्डे पडू लागले आहेत.पावसाळ्यात रस्त्यावर चिखल मातीचा खच पडला आहे. त्यामुळे या मार्गांवरून मार्गक्रमण करणार्‍या वाहनाना, मोटारसायकलस्वार, रिक्षा चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून रात्री अपरात्री अपघात होण्याचा धोकाही निर्माण झाला आहे.

Exit mobile version