2.20 कोटींचे अमली पदार्थ जप्त
| कळंबोली | प्रतिनिधी |
अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकान मोठी कारवाई करत दिवा-मुंब्रा परिसरातील कथित ड्रग्ज तस्करीचे जाळे उघडकीस आणले आहे. मुंब्रा पोलिसांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या कारवाईत तब्बल 2 कोटी 20 लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, दोन नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलिस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान पोलिसांना अमली पदार्थांच्या तस्करीसंदर्भात महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. अकुबा केनेथ (45) आणि संडे इझिनिक (47) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी 2 किलो 18 ग्रॅम एमडी, 316.5 ग्रॅम कोकेन आणि सहा मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची एकूण किंमत सुमारे 2 कोटी 20 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
