जिल्ह्यातील 50 हून अधिक शेतकर्यांची यंत्राला पसंती
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीने होणारी भातझोडणी आता आधुनिकतेकडे वळू लागली असल्याचे चित्र गावागावात दिसून येत आहे. यंत्राच्या मदतीने जिल्ह्यात भातझोडणीला अधिक पसंती दिली जात आहे. जिल्ह्यातील 50 हून अधिक शेतकर्यांनी भातझोडणी यंत्र घेऊन आधुनिकेतची जोड दिल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्याची पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळख होती. परंतु, वाढते नागरीकरण, औद्योगिकीकरणामुळे भाताचे क्षेत्र हळूहळू कमी होऊ लागले. खर्च अधिक व उत्पन्न कमी यामुळे अनेक शेतकर्यांनी शेती करण्यास पाठ फिरवली. त्यामुुळे जिल्ह्यातील भातपिकाचे क्षेत्र घटू लागले. भातपिकाबरोबरच फळ पीक, भाजीपाला लागवडीवर भर देण्यासाठी कृषी विभागाने जनजागृती सुरू केली. फळ व भाजीपाला लागवडीसाठी गावागावात बैठका घेऊन शेतकर्यांना शेतीकडे वळण्यास प्रोत्साहित केले. भातपिकाबरोबरच फळ व भाजीपाला पीक लागवड करण्याकडे शेतकरी वळू लागला. त्यामध्ये तरुणवर्गाचादेखील प्रतिसाद वाढला.
कमी मनुष्यबळात शेतीची कामे करण्यासाठी आधुनिक यंत्र सवलतीच्या दरात देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून आधुनिक पद्धतीने शेती करू लागला आहे. चारसूत्री पद्धतीने भातलागवड करण्यापासून रोपे लागवड, भातझोडणीची कामे आधुनिक पद्धतीने करण्यात आली. जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून भातकापणी सुरु झाली आहे. 95 टक्क्यांहून अधिक भातकापणीची कामे पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणी भाताची रोपे बांधून उडवी रचण्याचे काम केले जात आहे. काही ठिकाणी कापणी केल्यानंतर पाच दिवसांनंतर झोडणी केली जात आहे. परंतु, झोडणीसाठी मजूर मिळत नसल्याने झोडणीची कामे लांबणीवर जाण्याची चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी आधुनिक पद्धतीने झोडणीला महत्त्व देण्यास सुरुवात केली आहे. यंत्राद्वारे झोडणीची कामे जिल्ह्यातील अनेक भागात केली जात आहे. पारंपरिक पद्धतीने होणारी झोडणीची कामे यंत्रामुळे अवघ्या दोन ते चार तासांत पूर्ण होत आहेत. कमी मनुष्यबळाच्या मदतीने ही कामे होत असल्याने शेतकर्यांच्या वेळ व पैशाचीदेखील बचत होत असल्याचे बोलले जात आहे.
यंत्रामुळे भाताचा पेंढा गायब
पारंपरिक पद्धतीने भातपिकाच्या झोडणीसाठी मजूरकर घेतले जातात. झोडणीतून उपलब्ध झालेला पेंढा गोठ्यामध्ये साठवून ठेवला जातो. तो पेंढा पावसाळ्यात व उन्हाळ्यात गाय, म्हैस, बैल अशा पाळीव जनावरांसाठी खाद्य म्हणून उपयोगी ठरतो. परंतु, आधुनिक पद्धतीने भात झोडणीमुळे भाताच्या पेंढ्याचे रुपांतर भुश्यामध्ये रुपांतर होते. त्यामुळे यंत्रामुळे भाताचा पेंढा गायब होण्याची भीती व्यक्त केली जात असताना, गुरांना अन्यवेळी पेंढा मिळणे कठीण होण्याची चिंता अनेक शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.