शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुखांचा दणदणीत विजय
| सांगोला | प्रतिनिधी |
सांगोला मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी ‘काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सगळं ओकेमध्ये आहे’ या डायलॉगने प्रसिद्धी मिळविलेल्या विद्यमान आ. शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील यांचा 25 हजार 386 मतांनी दणदणीत पराभव केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला मतदार संघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील निवडणुकीत शेकापच्या उमेदवाराचा फक्त 768 मताने पराभव झाला होता. त्यामुळे शहाजी बापू पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तर, गेली पाच वर्षे शहाजी बापू पाटील व दीपक साळुंखे हे विकासकामाच्या नावावर एकत्र येऊन आमची अभेद्य जोडी असल्याचे सांगत होते. मागील दीड महिन्यांपूर्वी दीपक आबा साळुंखे पाटील यांनी आपला निवडणूक लढविण्याचा मनसुबा जाहीर केल्याने त्यांनी मागचा पुढचा विचार न करता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला व उमेदवारीही मिळवली. त्यामुळे या मतदारसंघात शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख, आ. शहाजी बापू पाटील, दीपक साळुंखे पाटील व अन्य 13 उमेदवार अशी लढत होती. दीपक साळुंखे पाटील हे प्रथमच निवडणूक लढवीत असल्याने ही निवडणूक प्रस्थापित तीन उमेदवारांच्या प्रतिष्ठेची होती. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी या निवडणुकीत घवघवीत यश मिळवले असून, विद्यमान आमदार शहाजी पाटील हे पिछाडीवर पडले. तर, त्यांचे एकेकाळचे सहकारी दीपक आबा साळुंखे पाटील हे तीन नंबरवर गेल्याने त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांना 1 लाख 16 हजार 256, शहाजीबापू पाटील यांना 90 हजार 870 तर दिपकआबा साळुंखे पाटील यांना 50 हजार 962 एवढी मते पडली. तर, पोस्टल मतदानामध्ये डॉ. बाबासाहेब देशमुख 1342, शहाजी पाटील 545, दिपक साळुंखे 738 मते मिळाली आहेत. सुरुवातीला पहिल्या फेरीला शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांना केवळ 138 मतांचे लीड मिळाल्याने काहीशा संभ्रमात असणार्या शेकाप कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसून आला. तर ही निवडणूक बापू व डॉ. बाबासाहेब यांच्यात चार-पाच हजारांच्या फरकाने होईल, असे वाटत होते. परंतु, 23 पैकी तीन फेर्यांमध्ये शहाजीबापूंना लीड सोडता प्रत्येक फेरीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे लीड कमी-जास्त प्रमाणात वाढतच गेले. प्रत्येक फेरीनंतर बाहेर शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष सुरू होता.23 व्या फेरीची मतमोजणी संपल्यावर डॉ. बाबसाहेब देशमुख यांना 25 हजारांपेक्षा जास्त लीड मिळत असून, त्यांचा विजय दृष्टिक्षेपात येताच मतमोजणी कक्षातून डॉ. अनिकेत देशमुख बाहेर पडले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी करीत त्यांना खांद्यावर घेऊन एकच जल्लोष केला. डॉ. बाबासाहेब देशमुख हे संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी मोजक्या कार्यकर्त्यांसह निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पोहोचले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी माळी यांनी त्यांना विजयाचे प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले.
अन्य उमेदवारांना मिळालेली मते
शशिकांत गडहीरे बसप 848, राघू घुटुकडे 972, एकनाथ शेंबडे 164, बाबासाहेब देशमुख 460, परमेश्वर गेजगे 265, बाळासाहेब इंगवले 142, मोहन राऊत 323, रणसिंह देशमुख 503, राजाराम काळेबाग 520, ज्ञानेश्वर उबाळे 279, यापैकी कोणीही नाही (नोटा) 1106.