एकीतून नवा बदल घडणार- चित्रलेखा पाटील

। अलिबाग । प्रतिनिधी ।

छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून सक्षम काम केले आहे. स्वतः आजारी असतानाही त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी काम केले आहे. दिल्लीतील मोदी, शहा यांच्यासमोर ते झुकले नाही. परंतु, मिंदे गटाचे नेते त्यांच्यासमोर झुकले. आता गद्दारी करणार्‍यांना चिखलात लोळविण्याची वेळ आली आहे. ही वेळ परिवर्तनाची, एका वेगळ्या बदलाची आहे. या एकीतूनच नवीन बदल घडणार, असा विश्‍वास महाविकास आघाडी पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांनी गुरुवारी (दि. 7) व्यक्त केला.

यावेळी अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नृपाल पाटील, प्रदीप नाईक, शिवसेनेच्या जिल्हा महिला संघटक दिपश्री पोटफोडे, उपजिल्हा संपर्क संघटिका शिल्पा घरत, विधानसभा संघटिका तनुजा पेरेकर, अलिबाग तालुका महिला संघटिका स्नेहल देवळेकर, दर्शना वाकडे, वंदना पाटील, निवेदिता गावंड, शिल्पा ठाकूर, प्रणाली राऊत, तृप्ती जावकर, सुबोध राऊत, धनंजय गुरव, शंकर गुरव, संदीप पालकर, नवशाद दळवी, विनायक कटोरे, कृष्णा कडवे, कृष्णा म्हात्रे, अशोक नाईक, मंगेश म्हात्रे, वसंत जैन, प्रल्हाद पाटील, प्रकाश गायकर, गिरीश शेळके, हेमंत पाटील, सुरेश झावरे, राजा सोडेकर आदी अलिबाग, मुरूड तालुक्यातील उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे पदाधिकारी, शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी चित्रलेखा पाटील म्हणाल्या, अलिबाग विधानसभा मतदारसंघातील निवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रचार सुरु झाला आहे. यानिमित्त अलिबागमध्ये उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी पाहून हीच खरी विजयाची नांदी आहे, असा विश्‍वास आहे. मतदारांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिला कुटुंब चालवू शकते, समाजात चांगले काम करू शकते. तर राज्य, देश का चालवू शकत नाही. ही भूमिका शेकाप नेते यांनी घेत माझ्यावर विश्‍वास ठेवून उमेदवारी दिली. महाविकास आघाडीने जो विश्‍वास ठेवला आहे, तो सार्थ करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.

पुढे त्यांनी सांगितले, लोकसभच्या निवडणुकीत महायुतीला चांगलाच फटका बसला. मिळालेला फटका भरून काढण्यासाठी लाडकी बहीण योजना आणली. बहिणींना पंधराशे रुपये देऊन मते मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु, महाराष्ट्रातील जनता महागाईमुळे त्रस्त झाली आहे. शिक्षण असूनदेखील नोकरी नसल्याने अनेक तरुणांवर बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे. या निवडणुकीत एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. सुशिक्षित व सुज्ञ महिला या निवडणुकीत मिंदे गटातील नेत्यांना जागा दाखवतील, असा विश्‍वास आहे. तुमच्या साथीने आपला विजय हा नक्कीच होईल, असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version