पारंपरिक तेल व्यवसायाला नवे रूप

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
पुणे-मुंबईमध्ये नोकरीच्या मागे न लागता कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील दोन तेली बंधूंनी पारंपरिक व्यवसाय निवडला आहे. लाकडी घाणा तेल व्यवसाय तिसर्‍या पिढीनंतर या दोघांनी स्टार्टअपच्या स्वरूपामध्ये सुरू केला आहे. या व्यवसायात फारसे उत्पन्न नसले तरी बेरोजगारी दूर करण्यासाठी त्यांनी केलेली ही धडपड नव्या पिढीला आदर्श डोळ्यासमोर ठेवणारी आहे.

बोर्डवे येथील कौस्तुभ संतोष तेली आणि त्यांचा चुलत भाऊ कौशिक सुनील तेली यांनी बोर्डवे गावांमध्ये आपल्या वडिलोपार्जित लाकडी घाणा ऊर्जितावस्थेत आणला आहे. याचे कारण ठरला कौस्तुभ तेली. या पदवीधर तरुणाला चार वर्षांपूर्वी नेव्हीमध्ये कॉल आला होता; मात्र तिथे यश न मिळाल्याने मुंबईत काही काळ नोकरी करून तो गावाकडे आला. गावी आल्यानंतर कौशिक हा कृषी डिप्लोमा केलेल्या व बेरोजगार असलेल्या भावाने एकत्रित विचार केला.

गावातीलच काहींनी वडिलोपार्जित व्यवसाय तुम्ही सुरू केला तर बरं होईल, असा सल्ला दिला. तो सल्ला मिळाल्यानंतर तेली बंधूनी गुगल सर्च करून लाकडी घाण्यासाठी मिळणारे सगळे साहित्य आणि यंत्रणा शोधली. अखेर त्याला यश आले आणि वडिलोपार्जित असलेला तेलाचा लाकडी घाणा व्यवसाय त्यांनी मार्च 21 रोजी सुरु केला.

दरम्यान, पारंपरिक व्यवसायातून स्टार्टअप सुरू केल्यानंतर ते समाधानी आहेत; पण या व्यवसायामध्ये हवी तशी भरभराट त्यांना अजूनही मिळालेले नाही. कारण बाजारपेठेमध्ये खाद्य तेलाचे दर फारच कमी आहेत. गावठी घाण्यावरच्या शेंगदाणा तेलाचे दर अधिक आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवरील ग्राहक फारसे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मार्केटमध्ये उच्च दर्जाचे तेल खरेदी करणारा ग्राहक शोधावा लागतो असे मत कौस्तुभ तेली यांनी व्यक्त केले.

तेली बंधूंनी लाकडी घाण्यावर महिन्याकाठी साधारण अडीचशे लिटर तरी उत्पादन घेण्याचा विचार सुरू केला आणि त्याला यशही आले. यासाठी त्यांनी एक ते 5 लिटर असे पॅकेजिंगचेही ज्ञान अवगत केले आहे. प्लास्टिकच्या एक लिटरच्या बॉटलमध्ये शुद्ध शेंगदाणा तेल ते विक्री करतात. बाजारभावापेक्षा कमी दराने जवळचे ग्राहक किंवा मार्केटमधील काही व्यावसायिक त्यांचा माल उचलत आहेत.

Exit mobile version