जनावरांच्या चार्याचा प्रश्न ऐरणीवर
। पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील पाली शहराजवळ असलेल्या झाप गावातील दोन शेतात बुधवारी (दि.26) दुपारच्या सुमारास वणवा लागल्याची घटना घडली हाती. या वणव्यात शेतकर्यांच्या डोळ्यांदेखत हजारो पेंढ्यांच्या गंजी जळून खाक झाल्या आहेत. त्यात शेतकर्यांचे पंधरा ते वीस हजारांचे नुकसान झाले असून जनावरांच्या चार्याचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, पेंढ्यांना आग लागल्याचे समजताच शेतकरी शेतावर पोचले. मात्र, आगीने रौद्र रूप धारण केले होते. बघता बघता दोन्ही शेतांमध्ये असलेल्या पेढ्यांना आग लागली आणि शेतकर्यांच्या डोळ्यादेखत सर्व पेंडा जळून खाक झाला. यावेळी आग विझवण्यासाठी कोणतेही साधन नसल्यामुळे आणि वेळही नसल्याने शेतकर्यांना काहीच करता आले नाही. याबाबत शेतकरी सुधीर भालेराव यांनी सांगितले की, ही आग मानवनिर्मित की नैसर्गिक वणव्याने लागली आहे, किंवा विद्युत तारेचा शॉर्टसर्किट होऊन लागली आहे, याबाबत काही अंदाज नाही. तसेच तलाठी, कृषी अधिकारी व वीज वितरण अधिकारी यांना या घटनेची माहिती दिलेली आहे. तरी घटनेचा पंचनामा करून झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकर्यांना मिळावी, अशी मागणी शेतकरी सुधीर भालेराव व चंद्रगुप्त भालेराव यांनी केली आहे.