। मुंबई । वृत्तसंस्था ।
मुंबई इंडियन्सच्या संघाने उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर युपीच्या संघाचा एकतर्फी पराभव करत 8 फलंदाज बाद करून सामना जिंकला. मुंबई संघाच्या नताली स्किव्हर ब्रंट आणि हिली मॅथ्यूज यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 143 धावांचे लक्ष्य सहज गाठले. या विजयासह मुंबईचा संघ आता वुमन्स प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना यूपी संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 142 धावा केल्या. मुंबई संघाने 143 धावांचे लक्ष्य 8 गडी राखून पार करत गुणतालिकेचा संपूर्ण खेळच बदलून टाकला आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या यूपी वॉरियर्सने सलामीच्या जोडीत मोठा फेरबदल केला. ज्याचा संघाला चांगलाच फायदा झाला. पण मधल्या फळीतील फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. ग्रेस हॅरिसने 45 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तिला साथ देत वृंदा दिनेशनेही 33 धावा केल्या. युपीने 81 धावांत फक्त 2 गडी गमावले होते. पण ग्रेस हॅरिसची विकेट गेल्यानंतर युपी संघाच्या धावांना ब्रेक लागला आणि मुंबईच्या गोलदाजांनी सामन्यात पुनरागमन केले. मुंबईकडून नॅट स्किव्हर ब्रंटने 3 बळी, शबनब इस्माईल आणि संस्कृती गुप्ताने 2 बळी तर हिली आणि अमेलिया केरने 1-1 बळी घेतला. वादळी सुरूवात होऊनही यूपीचा संघ 143 धावाच करू शकला.
युपीने दिलेल्या 143 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतान मुंबईने 6 धावांवर यास्तिका भाटियाच्या रूपाने पहिला बळी मिळाला. यानंतर जगातील पहिल्या क्रमांकाची व्हाईट बॉल अष्टपैलू खेळाडू हिली मॅथ्यूज धावा काढण्यासाठी धडपडताना दिसली. पण अखेरीस तिने मोठे प्रयत्न करत आपला फॉर्म परत मिळवत 50 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 59 धावांची उत्कृष्ट खेळी केली. शानदार फॉर्मात असलेल्या नॅट स्किव्हर ब्रंटने 44 चेंडूत 13 चौकारांसह 75 धावांची खेळी करत तिला चांगली साथ दिली. तर हिली बाद झाल्यानंतर हरमनप्रीत कौरने विजयी चौकार लगावत 17व्या षटकातच संघाला विजय मिळवून दिला.