अनेक सोयीसुविधांचा अभाव
| आपटा | प्रतिनिधी |
आपटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 1995 साली बांधण्यात आले होते. परंतु, सध्या या केंद्राची दुरवस्था झाली असून केंद्राची इमारत अनेक ठिकाणी मोडकळीस आली आहे. या ठिकाणी परिसराती 35 गावे व 41 वाड्यांतील रूग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, या प्राथमिक आरोग्य केंद्रालाच उपचाराची गरज असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
आपटा या प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील 35 गावे व 41 वाड्यांतील रूग्ण येत असतात. हे आरोग्य केंद्र या परिसरामध्ये एकमेव असे ठिकाण असल्यामुळे सर्व औषध उपचार या भागातील लोकांना मिळत असतो. या केंद्राच्या अंतर्गत शिरढोण, गुळसुंदे व वावेघर हे तीन लहान आरोग्य केंद्र आहेत. परंतु, या भागातील हे जुने प्राथमिक आरोग्य केंद्र असून येथे अनेक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. याठिकाणी नर्स, शिपाई आणि सफाई कामगारांची वानवा आहे. तसेच, येथील हॉलमध्ये बसण्यासाठी खुर्च्या देखील नाहीत. या केंद्रात प्रसुतीगृह देखील आहे. परंतु, या ठिकाणी मुबलक सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने फार कमी प्रमाणात या ठिकाणी महिला प्रसुतीसाठी येतात. त्याचबरोबर आरोग्य केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी मोडकळीस आली आहे. त्यामुळे ही इमारत आता पूर्ण नवीन केली पाहिजे, यासाठी बांधकाम विभागाकडे विनंती अर्ज केलेले आहेत. तसेच, येथे पूर्ण सुविधा मिळायला पाहिजेत. केंद्रात कायम डॉक्टर राहिले पाहिजेत, त्याचबरोबर येथे राहण्यासाठी त्यांना रूम उपलब्ध करून दिला पाहिजे. याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे परिसरातील नागरिकांमधून बोलले जात आहे.







