भरमसाठ वृक्षतोड; नव्या वृक्ष लागवडीच्या नियोजनाची गरज
| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरान घाटमाथ्यावर होणारी भरमसाठ वृक्षतोड आता माथेरानच्या मुळावर उठली असून, यावर्षी माथेरानमध्ये गर्मीचा उच्चांकी नकोसा विक्रम नोंदला गेला आहे. त्यामुळे माथेरानमध्ये पुन्हा एकदा वृक्ष लागवड व त्याचे संगोपन व्हावे, तो फक्त दिखावा न करता झाडे जगवण्याकरिता प्रयत्न झाला पाहिजे, अशी चर्चा समोर येत आहे.
माथेरान हे थंड हवेसाठी जगप्रसिद्ध ठिकाण असून, मुंबई-पुण्यापासूनचे जवळचे पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी थंड हवेचा आस्वाद घेण्याकरिता देश विदेशातून अनेक पर्यटक घेत असतात. परंतु, मागील काही वर्षांपासून माथेरानमधील हवामानामध्ये कमालीचा बदल घडत आहे. कधीही न जाणवणारी गर्मी माथेरानमध्ये आता शिरकाव करू लागली आहे. यंदा तर माथेरानने प्रथमच गर्मीचा उच्चांक गाठला असून, येथील तापमान 40अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. त्यामुळे माथेरान या पर्यटनस्थळाकरिता ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे स्थानिकांनी वेळेतच सावध होणे गरजेचे आहे.
दरम्यान, माथेरानच्या चारी बाजूस असणाऱ्या अनेक वाड्यांमधून येथील डोंगररांगांमध्ये असलेल्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. ही कत्तल रोखण्यासाठी वन विभाग सपशेल अपयशी ठरलेला आहे. माथेरान येथून नेरळकडे जाणाऱ्या डोंगररांगांत तर जंगलच शिल्लकच राहणार नाही, अशी परिस्थिती काही वर्षांमध्ये होणार आहे. रोजच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून लाकडे जमा करणारी मंडळी घाटामध्ये दिसत असतात. परंतु, त्यावर कारवाई होत नाही. त्यातच माथेरानमध्ये नैसर्गिक आपत्तीतून अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. परंतु, या झाडांना पर्यायी वृक्षारोपण करून जंगल वाढवण्याचे प्रयत्न अपयशी ठरलेला आहे. वनविभाग दरवर्षी वृक्षारोपण करते, परंतु त्यातील किती झाडे जगतात? हा संशोधनाचा विषय आहे. वृक्षारोपण करणे व त्याचे संवर्धन करणे यामध्ये मोठी तफावत माथेरानमध्ये पहावयास मिळत आह. या वेळेला नवीन वनसंवर्धन समिती होणार आहे. त्यामुळे ते ‘वृक्षारोपण’ हा फक्त प्रयोग न करता त्यांच्या संवर्धनावर भर देतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात करंज व इंग्लिश झाडे लावण्यात येतात. त्याऐवजी येथील पर्यावरणाला जिवंत ठेवतील अशी झाडेच लावण्यात यावीत. जेणेकरून येथे पर्यावरण जिवंत राहील, अशी मागणी आता स्थानिकांमधून होत आहे.







