प्लास्टिकचे रिसायकलिंग, तर निर्माल्याचे खतात रूपांतर
| सुधागड-पाली | वार्ताहर |
नुकतेच दीड, पाच व दहा दिवसांच्या गणरायाचे विसर्जन झाले. यावेळी रोहा तालुक्यातील रोह्यासह 35 गावांतून जवळपास दहा टन निर्माल्य ज्यामध्ये हार, फुले दुर्वा इत्यादी वस्तूंचा समावेश आहे व साडेतीन टन प्लास्टिक जमा करण्यात आले आहे. अतिशय नियोजनबद्धरित्या पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
जमा झालेले प्लास्टिक व थर्माकोलसारखे घटक बाजूला काढून राहिलेल्या निर्माल्याचे खतामध्ये रूपांतर केले जाणार आहे. तसेच प्लास्टिकचे रिसायकल प्लांटमध्ये नेऊन रिसायकलिंग प्रोसेस केली जाणार आहे. दरम्यान, सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था रायगड, सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान, पोलीस ठाणे रोहा, दीपक नायट्रेट लिमिटेड रोहा व विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिटयूट, रोहा यांच्या सौजन्याने हा पर्यावरणपूरक गणेश उत्सव राबवण्यात आला.
असे आहे मोहिमेचे स्वरूप
नदी, तलाव व पाण्याच्या ठिकाणी होणार्या गणेश विसर्जनावेळेस त्या ठिकाणी निर्माल्य एकत्रीकरण केंद्र स्थापन करण्यात आले. यामध्ये दोन भागांमध्ये (सुके व ओले निर्माल्य) विभागले गेले. लोकांनी आपल्याकडे असलेलेले निर्माल्य तलाव, समुद्र किंवा नदीमध्ये किंवा पाण्याच्या ठिकाणी न टाकता निर्मल एकत्रीकरण केंद्रामध्ये जमा करण्यासाठी गावागावात बॅनर लावण्यात आले. तसेच समाज माध्यमांवरदेखील मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. याचा परिणाम असा झाला की लोकांनी निर्माल्य कलशामध्ये निर्माल्य जमा केले. त्यानंतर हे सर्व निर्माल्य स्वयंसेवकांच्या टीम द्वारे गोळा करण्यात आले आणि विलगीकरण केले गेले आहे.
खत निर्मिती करून मोफत वाटप
या जमा केलेल्या निर्माल्यावर प्रक्रिया करून त्याचे सेंद्रिय खत बनवण्यात येईल. तसेच बनवल्या गेलेल्या खताचे वितरण हे पर्यावरणपूरक गणेश उत्सव उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या गावांमध्ये केले जाणार आहे.
काळानुरूप बदल
गणेश उत्सव हा आपल्या अस्मितेचा परंपरेचा आणि संस्कृतीचा ठेवा आहे. भारतासह देशविदेशात पोहोचलेला गणेशोत्सव कालानुरूप बदलत आहे. मात्र आज साजरे होणारे गणेशोत्सव हे पर्यावरणाला हानिकारक तर ठरत नाहीत ना, याकडे मात्र लक्ष देऊन त्यामध्ये काळानुरूप विधायक बदल करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
पर्यावरण संवर्धन
कोणताही उत्सव साजरा करताना पर्यावरणाचा र्हास होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेणे आवश्यक आहे. गणेशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संरक्षण व संवर्धन यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी सर्वजण एकत्र आले. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणले.
गणेशोत्सव काळात होणारा थर्माकोल व प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणाला हानी पोहचवत असल्याने तो कशाप्रकारे टाळता येईल यावर लक्ष केंद्रित केले गेले. त्याचबरोबर नदी, तलाव व पाण्याच्या ठिकाणी गणपती उत्सवामध्ये वापरला गेलेला निर्माल्य हे पाण्यामध्ये टाकल्यामुळे निसर्गासाठी अति धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे जैवविविधतेवर फार मोठा आघात होत आहे. यामुळे विसर्जनावेळी निर्माल्य पाण्यात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रत्येक गावात विसर्जनस्थळी निर्माल्य कलश ठेवण्यात आले.