आरोपी उत्तर प्रदेशात जेरबंद
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यातील वावंजे गावात राहणार्या यावुब युनुस खान (60) या भंगार व्यावसायिकाची हत्या करुन पळून गेलेल्या श्रीकांत रामअकबल तिवारी या आरोपीला गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने उत्तर प्रदेशमध्ये जेरबंद केले आहे. मृत याकुब खान, आरोपी श्रीकांत तिवारी याची पत्नी आणि वडिलांबद्दल वारंवार अपशब्द वापरत असल्यामुळे आलेल्या रागातून श्रीकांत तिवारी याने यावुब खान याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या घटनेतील मृत यावुब युनुस खान पनवेल तालुक्यातील वावंजे गावात भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत होता. तर आरोपी रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह चालवत होता. यावुब खान श्रीकांत तिवारी याच्या पत्नीला आणि वडिलांना नेहमी अपशब्द वापरत होता. श्रीकांत त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हता. मात्र, त्यानंतरदेखील यावुब खान वारंवार त्यांना अपशब्द वापरत होता. याच गोष्टीचा राग आल्याने 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी याकुब खान त्याच्या ज्युपिटर स्कुटीवरुन जात असताना, श्रीकांत तिवारी याने त्याला मोरबे गावात जाण्याचा बहाणा करुन त्याला तेथील अग्रवाल फार्म, वुंभार खोती येथे नेले. याठिकाणी श्रीकांत तिवारी याने यावुब खान याच्या पाठीत धारदार हत्याराने हल्ला करुन तसेच त्याची गळा आवळून हत्या केली.
प्राथमिक तपासात श्रीकांत तिवारी यानेच यावुब खान यांची हत्या करुन पलायन केल्याचे आढळून आल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला होता. श्रीकांत तिवारी मोबाईल फोन न वापरता उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश राज्यात फिरत होता. त्यामुळे त्याचा शोध घेणे जिकिरीचे झाले होते. तांत्रिक तपासावरुन तो उत्तर प्रदेशमधील मुंगरा बादशहापूर येथे नातेवाईकांना भेटण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट-2चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण फडतरे, अजित कानगुडे, पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील आणि त्यांच्या पथकाने मुंगरा बादशहापूर येथे जाऊन सापळा रचला. तसेच तेथून तो पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यानेच यावुब खान याची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार गुन्हे शाखेने त्याला अटक करुन पुढील कार्यवाहीसाठी पनवेल तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले.