गुढीपाडव्यानिमित्त खरेदीला उधाण

दुचाकी वाहनांसह चारचाकी खरेदीसाठी गर्दी

। अलिबाग । प्रमोद जाधव।

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढापाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी (दि. 09) एप्रिल रोजी वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली. एका दिवसामध्ये तीनशेहून अधिक दुचाकी खरेदी झाली आहेत. गतवर्षीच्या तुलनेने यंदा दुचाकी खरेदीत खरेदीमध्ये दहा टक्केने वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. तसेच 100 हून अधिक चारचाकी वाहने खरेदी करण्यात आली. या निमित्ताने करोडोची उलाढाल झाली असली, तरीही गतवर्षीच्या तुलनेने चारचाकी वाहनांच्या खरेदीत 25 टक्के घट असल्याचे सांगण्यात आले आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने, जागा, घर, वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे या कालावधीत घरगुतीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या लहान मोठ्या वस्तू खरेदी करण्यावर अधिक भर दिला जातो. गुढीपाडव्याला वेगवेगळ्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काही ना काही खरेदी केली जाते. यंदा गुढीपाडव्या निमित्त मंगळवारी सकाळपासून वेगवेगळ्या शोरुमध्ये वाहन खरेदीसाठी ग्राहकांची लगबग पहावयास मिळाली. वाहन खरेदी केल्यावर सजवून त्याची मनोभावे पुजा करून ग्राहकांनी ते घरी नेले. खरेदी केलेल्या वाहनांसमवेत अनेकांनी सेल्फी व फोटो काढून सोशल मिडीयावर ते व्हायरलदेखील केले.

रायगड जिल्ह्यामध्ये यंदा होन्डा, हिरो शोरुमधून दुचाकी मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्या. पेट्रोलवर चालणार्‍या दुचाकीला ग्राहकांनी अधिक पसंती दर्शविली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेने दुचाकी खरेदीत दहा टक्केने वाढ झाली आहे. एकूण तीनशेहून अधिक दुचाकी खरेदी झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनेदखील खरेदीवर ग्राहकांनी कल दिला असल्याचे पहावयास मिळाले. यंदा मात्र दीडशेहून अधिक वाहने खरेदी होणे अपेक्षित होते. परंतु फक्त शंभरच चारचाकी वाहने खरेदी झाली आहेत. त्यामध्ये आरटीका, ब्रीझा, व्हॅगनर या गाड्या खरेदीला अधिक पसंती ग्राहकांनी दर्शविली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

सीएनजीवर चालणार्‍या चार चाकीला पसंती
पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळे गेल्या काही वर्षापासून सीएनजीवर चालणार्‍या गाड्या खरेदीचा कल वाढला आहे. त्यात सीएनजीचे पंप ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी उभे राहू लागल्याने त्याचा फायदा होऊ लागला आहे. त्यामुळे गुढीपाडव्या मुहूर्तावर यावर्षी सीएनजीवर चालणार्‍या चारचाकी वाहनांना पसंती असल्याचे सांगण्यात आले.
विजेवर चालणार्‍या गाड्यांचा खप कमी
विजेवर चालणार्‍या दुचाकी व चारचाकी वाहन खरेदीचा क्रेझ गेल्या दोन वर्षात वाढला होता. मात्र जिल्ह्यात मोजक्याच ठिकाणी विद्यूत पंपाचा अभाव असल्याने विजेवर चालणार्‍या वाहनांना ग्राहकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. बोटावर मोजण्या इतक्याच विजेवर चालणार्‍या गाड्या खरेदी झाल्या असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

यंदा दुचाकी वाहने खरेदीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा खरेदीत वाढ आहे. रोखीत व्यवहाराबरोबरच फायनान्सद्वारे वाहन खरेदीवर ग्राहकांनी भर दिला आहे. वाहन खरेदीवर वेगवेगळी सवलतदेखील उपलब्ध करण्यात आली आहे.

नवीन झा – व्यवस्थापक हिरो शोरुम

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सीएनपी व पेट्रोलवर चालणारी वाहने खरेदी करण्यासाठी शोरूमध्ये ग्राहकांची गर्दी आहे. यंदा दीडशेहून अधिक वाहने विक्री होण्याची अपेक्षा होती. मात्र फक्त शंभर वाहने खरेदी झाली आहे. त्यामुळे चारचाकी खरेदीत 25 टक्के घट आहे.

रविंद्र गडकरी – व्यवस्थापक सिमरन मोटर्स
Exit mobile version