जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे महाराष्ट्र व्यापी दोन दिवसाचा लाक्षणिक संप दिनांक 23 व 24 फेब्रुवारी 2022 रोजी घोषीत करण्यात आला आहे. या संपाची सूचना रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना देण्याचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप नागे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन सादर केले.
सर्वाना जुनी पेन्शन मंजूर करण्याबाबत केंद्र व राज्य शासन गंभीर नाही. केंद्र सरकारने पीएफआरडी कायदा मंजूर केला आहे. नविन अंशदायी पेन्शन योजना ही योजना अत्यंत धोकादायक आहे. म्हणूनच पीएफआरडी कायदा रद्द करुन सर्वाना जूनी पेन्शन योजना लागू करण्याकरीता देश पातळीवर आंदोलन उभारण्यात आले आहे. राज्य सरकारने सुद्धा राज्यातील सर्व सरकारी, निम सरकारी कर्मचारी व शिक्षक यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह अन्य प्रलंबित मागण्याकरिता महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचारी व शिक्षक येत्या 23 व 24 फेब्रुवारी रोजी 2 दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्व राज्य सरकारी, निम सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.
सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक यांना अंशदायी पेन्शन रद्द करुन, 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करा, खाजगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करुन सध्याच्या अंशकालीन व कंत्राटी व बंधपत्रित कर्मचार्यांच्या सेवा नियमित करा, सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरा व ही पदे भरतानाच अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाअट करा, चतुर्थश्रेणी कर्मचारी यांच्या वारसांना शासकीय नोकरीत सामावून घ्या, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवा, लिपीक वर्गीय कर्मचारी व अन्य कर्मचार्यांचे वेतनश्रेणी त्रुटी दूर करा, कंत्राटी कर्मचारी, कोतवाल, आशा, अंगणवाडी ताई, महिला परिचर सह सर्व कंत्राटी कर्मचारी व शिक्षक यांना किमान वेतन द्या व त्यांना पेन्शन योजना लागू करा, इतर सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधित संवर्ग संघटनेच्या प्रतिनिधींसोबत निर्णायक चर्चा करा या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदिप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, उपाध्यक्ष कोषाध्यक्ष दर्शना पाटील, प्रफुल्ल कानिटकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.