4 विद्यार्थ्यांसह महिला केअरटेकर जखमी
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईच्या सांताक्रूझ परिसरात शालेय विद्यार्थ्यांना घरी घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने ही व्हॅन निघाल्याने चालकाचे व्हॅनवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला आहे. या दुर्घनटेत 4 विद्यार्थ्यांसह एक महिला केअर टेकर आणि स्वतः चालक जखमी झाले आहेत. त्यामुळे पालकांसह नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सांताक्रूझ पश्चिमेकडील मॅनोर इंटरनॅशनल स्कूलची ही व्हॅन आहे. भरधाव वेगात असल्यामुळे वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात व्हॅन चालकासह एकूण सहा जण जखमी झाले आहेत. यात 4 विद्यार्थी आणि बसमधील महिला केअर टेकरचा देखील समावेश आहे. अपघातात व्हॅनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या जखमींवर सांताक्रूझ येथील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पालकांनी वाकोला पोलीस ठाण्यात चालकाविरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाहन चालकाने गाडी चालवताना मद्यपान केले होते का? याबाबत वाकोला पोलीस तपास करत आहेत. मात्र, वाहन चालकाकडून झालेल्या या अपघातामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा अधिक तपास वाकोला पोलीस करीत आहेत.