अनुचित प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर जामर बसवणार
आयुक्त गणेश देशमुख यांची माहिती
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
महापालिकेतील 377 पदांसाठी तब्बल 54 हजार 588 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे लवकरच परीक्षेची तारीख जाहीर होणार आहे. परीक्षेतील अनुचित प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक केंद्रावरती जामर बसविण्याची सोय पालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. जेणे करून उमेदवारांना मोबाईल, ब्लूटूथ ,डिजीटल वॉचेस आदी साधनांचा वापर करता येणार नाही.
महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार 13 जुलै रोजी एकुण 41 संवर्गातील गटफअफ ते गट मडफ मधील 377 रिक्त पदांसाठी सरळ सेवेमार्फत भरती प्रक्रियेसाठी जाहिरत प्रसिध्द करण्यात आली होती. भरतीची सर्व प्रक्रिया ही टीसीएस कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर आस्थापनेवर प्रथमच होणाऱ्या भरती प्रक्रियेला उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद दिसून येत आहे. महापालिकेच्या भरती प्रक्रियेमध्ये 377 पदांसाठी एकुण 54 हजार 558 अर्ज प्राप्त झाले आहेत.
या भरती प्रक्रीयेमध्ये प्रशासकीय, अभियांत्रिकी, तांत्रिक, विधि, अग्निशमन सेवा, सुरक्षा सेवा, माहिती व तंत्रज्ञान सेवा, लेखा व वित्त सेवा, उद्यानसेवा, शहर विकास सेवा, यांत्रिकी सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, क्रीडा सेवा, निमवैद्यकीय सेवा, पशुवैद्यकीय सेवा, लेखा परीक्षण सेवा आदी विभागांतील एकुण 377 पदांकरिता ही भरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले होते. 15 सप्टेंबरही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया पुर्ण होताच परिक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांना त्याचे प्रवेश पत्र टीसीएस कंपनीमार्फत पाठवण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पनवेल महानगरपालिका व टीसीएस यांनी निश्चित केलेल्या केद्रांवरती ही परीक्षा घेण्यात येईल.
ही परीक्षा पारदर्शी होण्याकरीता खबरदारीचे उपाय म्हणून प्रत्येक केंद्रावरती जामर बसविण्याची सोय पालिकेच्यावतीने करण्यात येणार आहे. जेणे करून उमेदवारांना मोबाईल, ब्लूटूथ ,डिजीटल वॉचेस आदी साधनांचा वापर करून अनुचित प्रकार करता येणार नाही.तसेच प्रत्येक केंद्रावरती सुरक्षितेच्या दृष्टीने पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक केंद्रावरती महापालिकेचा एक नियंत्रण अधिकारी व एक सहाय्यक अधिकारी अशा दोन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेतून महापालिकेस प्रशिक्षित व उच्च शिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याची माहिती आस्थापना उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली आहे.