‌‘ती’ ट्रायसिकल भंगारात

महिनाभरापूर्वीच केले होते वितरण

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना भारत सरकार आणि कंपन्यांचे सीआरएस फंडातून विविध प्रकारचे साहित्य भेट दिले होते. त्यात अपंग व्यक्तींना बॅटरीवर चालणारी ट्रायसिकल भेट देण्यात आल्या होत्या. अपंगांना त्यांच्या पायाच्या आजारावर मात करण्यासाठी देण्यात आलेल्या ट्रायसिकलपैकी एक ट्रायसिकल चक्क भंगाराच्या दुकानात आढळून आली आहे. नवी कोरी बॅटरीवर चालणारी ट्रायसिकल अल्प किमतीत भंगारात विकली गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


भारत सरकारचे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभाग अपंग व्यक्तींच्या सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसनासाठी विविध योजना राबविते. त्यात दिव्यांग अपंग पुनर्वसनाच्या क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी लाभार्थी यांना लाभ देण्यात आला होता. नेरळ येथे महिन्यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात मावळ लोकसभा मतदारसंघ खासदार श्रीरंग बारणे यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील दिव्यांग व्यक्तीसाठी मोठी मदत त्यांच्यासाठी आवश्यक असलेले वेगवेगळ्या प्रकारचे साहित्याचे वाटप करून केली होती. त्यात पायाने अधू असलेल्या तब्बल 54 दिव्यांग यांना ट्रायसिकलची मदत करण्यात आली होती. त्या ट्रायसिकलची बाजारातील किंमत 20 ते 60 हजार या दरम्यान आहे. मात्र, तीच ट्रायसिकल कर्जत तालुक्यातील दिव्यांग व्यक्तीने भंगारात विकली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे खळबळ माजली असून, ट्रायसिकल दिव्यांग व्यक्तींना देण्याचा उद्देश हा त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत व्हावी असा प्रयत्न मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि भारत सरकार यांचा होता. मात्र, ती ट्रायसिकल बाजारात भंगारात विकली गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, भंगार गोळा करणारे हे वेगवेगळ्या गावात जाऊन भंगार गोळा करून आणत असतात. त्यातील एका भंगाराच्या दुकानात नवी कोरी ट्रायसिकल आढळून आल्याने अंध अपंग संस्थेच्या कारभाराबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.

नेरळ येथील कार्यक्रमात वितरित करण्यात आलेली सदर ट्रायसिकल ही कोणत्या लाभार्थ्यांनी विकली आहे हे अद्याप कळून आले नाही. त्याचप्रमाणे भंगाराच्या दुकानात दिसून आलेली ट्रायसिकल ही त्या दिव्यांग बांधवाने विकली की त्याची फसवणूक करून ती अन्य व्यक्तीने भंगार विक्रेत्याला विकली आहे काय? याचा शोध आम्ही संघटनेच्या वतीने घेत आहोत.

लहुदास डायरे, उपाध्यक्ष, अंध अपंग सेवा संस्था, वारे
Exit mobile version