सव्वा गुंठ्यामध्ये केली स्ट्रॉबेरीची शेती
| सुधागड-पाली | वार्ताहर |
चार्टर्ड अकाऊंटंट व प्रयोगशील शेतकरी असलेल्या विक्रम चंद्रहास पंड्या यांनी सुधागड तालुक्यातील उन्हेरे येथील आपल्या शेतात अनोखे प्रयोग केले आहेत. त्यांनी अवघ्या सव्वा गुंठ्ठे शेतात स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. त्यांनी इस्रायली पद्धतीने 400 केशर आंब्याची लागवड केली आहे. आपल्या बागा त्यांनी विविध प्रकारच्या भाजीपाल्यांनी फुलवल्या आहेत. कमी जागेत जास्त उत्पन्न देणाऱ्या पीकांचे उत्पादन घेऊन त्यांनी अन्य शेतकऱ्यांसाठी आदर्श घालून दिला आहे.
सव्वा गुंठ्याच्या ग्रीन हाऊसमध्ये त्यांनी स्ट्रॉबेरीची विंटर डाऊन व्हारायईटीची 300 रोपे लावली आहेत. या स्ट्रॉबेरीचे उत्पादन नोव्हेंबर अखेरपर्यंत सुरू होणार आहे. निसर्ग चक्रीवादळापूर्वी म्हणजे 2019 ला पंड्या यांनी अडीच गुंठ्यामध्ये स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती केली होती. पण चक्रीवादळामध्ये ग्रीन हाऊस कोसळून गेले होते. त्यावेळी आठवड्याला तब्बल 10 किलो स्ट्रॉबेरीचे उत्पादन भेटत होते. त्याचप्रमाणे पंड्या यांनी घनलागवड इस्त्राईल पद्धतीने 400 केशर आंब्याची रोपे लावली आहेत. लवकरच त्यांचे उत्पादन सुरू होणार असल्याचे पंड्या यांनी सांगितले.
मशागतीसाठी सूक्ष्म अन्नद्रव्य, गांडूळ खत आणि लाल माती मिश्रणचा वापर केला आहे. त्याचबरोबर कीटकनाशके व बुरशीनाशकांचा वापर त्यांनी केला आहे. ग्रीन हाऊसचा खर्च हा एकदाच झाला आहे. त्याचा वापर कायमस्वरुपी करता येणार आहे. रोप लागवडीसाठी सहा हजार रुपये खर्च आला आहे. यामध्ये रोपे, मल्चिंग पेपर व मजुरीचा समावेश आहे.
सध्या स्ट्रॉबेरीची प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर ग्रीन हाऊसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या सुद्धा लावल्या आहेत. शेतीत नवनवीन प्रयोग करून विविध फळपिके व भाजीपाल्याचे चांगले उत्पादन मिळविणे शक्य आहे.
विक्रम चंद्रहास पंड्या
चार्टर्ड अकाऊंटंट व प्रयोगशील शेतकरी, उन्हेरे-सुधागड
योग्य मशागत, तापमान नियंत्रण व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सुद्धा स्ट्रॉबेरीची शेती बहरू शकते. पॉलिहाऊस किंवा ग्रीन हाऊसमध्ये स्ट्रॉबेरी शेती करताना योग्य खबरदारी व मार्गदर्शन घ्यावे. तसेच स्ट्रॉबेरीसोबत बाजूला भाजीपाल्याचे आंतरपीक सुद्धा घ्यावे.
ऋषी झा, ध्रुव ऍग्रो व लँडस्केप, सुधागड