| अलिबाग | प्रतिनिधी |
शहापूर -धेरंड पोहोच रस्ता होण्यासाठी श्रमिक मुक्ती दल पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.10 डिसेंबरपर्यंत हा पोहोच रस्ता न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनावर राजन ग. भगत, सुदर्शन म पाटील, मेघनाथ पाटील, अनिरुद्ध म्हात्रे, मोहन जनार्दन पाटील मारुती गजानन पाटील आदींच्या स्वाक्षर्या आहेत.
10 डिसेंबरपर्यंत पोहोच रस्त्यास सुरुवात झाली नाही तर विठ्ठलाची प्रतीकात्मक दिंडी शहापूर ते अलिबाग एमआयडीसी ऑफिस पर्यंत काढली जाईल. असे या निवेदनातून सुचित करण्यात आले आहे. या पोहोच रस्त्याबाबत डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या अध्यक्षतेखाली 30 ऑगस्टला एक बैठक घेण्यात आली होती. यावेळी खारेपाटात केवळ 4 च महिने काम करता येत असल्याने व गावे वाचवण्यासाठी पोहोच रस्ता होणे बाबत तातडीने कार्यवाही होणे साठी पुढाकार घेतला जावा,अशी मागणी करण्यात आली होती. सदर बैठकीत खालील निर्देश दिले होते. एमआयडीसी व महसूल खात्यांनी पोहोच रस्त्याचे सर्वेक्षण करून नकाशावर मार्किंग करून जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावा. जे एस डब्ल्यू कंपनीने दिलेल्या मार्गावर राखमिश्रीत माती टाकून पोहोच रस्ता करावा.
वरील निर्देशां पैकी फक्त सर्वेक्षण झाले, अहवाल सादर केला कि नाही या विषयी कोणतीही माहिती श्रमिक मुक्ती दलास दिलेली नाही. या बैठकीचे इतिवृत्त अजून तगायत प्राप्त झालेले नाही.असे या निवेदनात नमूद केलेले आहे.
दिंडीचा मार्ग
(टप्पा क्र.1) शहापूर येथे स्व. आप्पासाहेब तथा नारयण नागू पाटील यांच्या जन्मस्थान असलेल्या घरा समोर सर्व प्रकल्पग्रस्त एकत्र येणार.
(टप्पा क्र 2) शहापूर ते म्हसोबा मंदिर
( टप्पा क्र.3) म्हसोबा मंदिर ते चरी शेतकर्यांचे लढ्याचे प्रतिक यांचे असलेल्या ठिकाणी दुपारी शपथ घेणार
(टप्पा क्र.4) पातृबाई मंदिर येथे सर्व शेतकर्यांचे भोजन
(टप्पा क्र. 5) पातृबाई मंदिर ते पिंपळ भाट चहापान आगरी समाज अलिबाग यांचे कडून पिंपभाट ते एमआयडीसी ऑफिस