| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील काराव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये महामार्गाला लागून असलेल्या डोंगरावर मोठया प्रमाणात उत्खनन सुरु आहे. मात्र, त्या उत्खननाबाबत महसूल विभाग अनभिज्ञ असल्याचे चौकशीत आढळून आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात महसूल बुडाला आहे.
ज्या डोंगरावर उत्खनन चालू आहे तिथे चार पोकलेन, दोन हायड्रा, दोन ब्रेकर, तीन डंपर अशा यंत्र सामुग्रीने उत्खनन दोन महिने सुरु आहे. परंतु ज्यावेळेला प्रसार माध्यमानी या उत्खननाकडे लक्ष केंद्रीत केले त्यावेळेला दोन दिवसापूर्वी तलाठी पार्वती वाघ यांनी पंचनामा केल्याच भ्रमंती ध्वनीवरून बोलताना कबूल केले. गेली दोन महिने पूर्ण डोंगरावर माती व दगडांचे मोठयाप्रमाणात उत्खनन झाले असून यामध्ये महसूल खात्याचे लाखोंचे नुकसान झालेले आहे. एकुण वेगवेगळया सर्व्हे नंबर मध्ये उत्खनन सुरु असल्याचे वाघ यांनी सांगितले.
काराव येथे होत असणार्या उत्खननाबाबत महसूल विभागाचे वरिष्ठ लिपीक पंडीत राठोड यांना भ्रमंती ध्वनीवरुन विचारणा केली असता त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्याबाबत मला तोंडी कळविले आहे. परंतु आत्तापर्यंत टपालात लेखी स्वरुपात पंचनाम्याची प्रत उपलब्ध झालेली नसल्याटी माहिती दिली.
डोंगरावर झालेल्या वृक्ष कत्तलीबाबत वडखळ वनक्षेत्रपाल अधिकारी संस्कृती पाटील यांना प्रत्येक्ष भेटून विचारणा केली असता त्यांनी कार्यालयाकडे रविंद्र वाडपाले यांनी 122 झाडे तोडण्याची परवानगी मागितली. आम्ही 122 झाडे तोडायला परवानगी दिलेली आहे. मात्र, 122 पेक्षा जास्त झाडे तोडल्यास आम्ही त्यावर दंडात्मक कारवाई करु. असा इशारा दिला आहे.