अॅड. राकेश पाटील यांची गुन्हा दाखल करण्याची मागणी
। रायगड । खास प्रतिनिधी ।
करोडो रुपये खर्च करून चिंचोटीमध्ये जलजीवन योजना राबविण्यात आली आहे. मात्र आजही या गावातील नागरिक पाण्यासाठी वणवण करीत आहेत. या योजनेमध्ये सरकारी निधीचा अपहार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. राकेश पाटील यांनी केला आहे. याबाबत त्यांनी सरपंचसह, ग्रामसेवक, व ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे सरपंचसह अधिकारी अडचणीस सापडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राकेश पाटील यांच्या तक्रारीनुसार, चिंचोटीमध्ये नळ पाणी पुरवठा योजना सन 2021-2022 मध्ये राबविण्यात आली होती. त्यासाठी एक कोटी 98 लाख 58 हजार 100 रूपयांचा निधी लोक वर्गणीतुन उभा करण्यात आला होता. या निधीपैकी चिंचोटी गावाच्या नळ पाणी योजनेकरीता 76 लाख 16 हजार 345 रूपयांच्या निधीची तरतुद शासनाने केली.याबाबत ग्रामपंचायतीने 2 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या ग्रामसभेध्ये कामाला मंजूरी दिली. काम पूर्ण होण्याचा कालावधी 27 नोव्हेंबरपर्यंत होता. कामाची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाची होती. गावात जलजीवन योजनेचा ठेका झाद इंटरप्रायझेस यांना देण्यात आला होता. कंत्राटदार झाद इंटरप्रायझेस यांनी गावातील काही भागांमध्ये पाईप लाईन टाकली तर काही ठिकाणी अजून पर्यंत पाईप लाईनच पोहचलेली नाही. तर काही ठिकाणी पाईप उघडयावर आहेत.
त्या कंत्राटदाराच्यावतीने सहकंत्राटदार म्हणून काम करणार्या गावातील काही कंत्राटदारांनी पाईपवरून नळ कनेक्शन जोडण्यासाठी गावातील नागरिकांकडून प्रत्येक नळ कनेक्शन मागे 250 रुपये वसुल केले. 250 रुपये घेण्याचा ठेकेदाराला कोणताही अधिकार नसताना बेकायदेशीरपणे लोकांकडून पाणी न देताच लुट केली. नळ योजनेसाठी पाण्याची टाकी उभी करण्यात आली असून पाण्यासाठी विहीर व केबीनही बांधण्यात आली आहे. ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे.
जलजीवन योजनेचे काम अपुर्ण असल्याने येथील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. योजनेत जनतेचा पैसा केवळ कागदोपत्री वापरलेला दिसत आहे. परंतु प्रत्यक्षात त्या योजनेची कोणतीही अमंजलबजावणी कुठेही झालेली नाही. याकरीता शासकीय अधिकारी, जनतेचे सेवक ग्रामपंचायत हेच दोषी आहेत. कारण प्रत्यक्षात अशी कोणतीही योजना न राबवता त्याची खोटी बिले काढुन पैसे लाटलेले आहेत, असा आरो आहे.
चिंचोटी गावामध्ये सध्या प्यायला पाणी नाही ही वस्तुस्थिती आहे, महिला सरपंचाच्या खुर्चीवर “पतीदेव“बसूनही योजना अपयशी झाली आहे, या योजनेत भ्रष्टाचार करणार्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली असून जिल्हा परिषदेने प्रथम पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा.
अॅड. राकेश पाटील, तक्रारदार, सामाजिक कार्यकर्ते
पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषद आणि संबंधीत ठेकेदार यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे. 26 जानेवारी 2025 रोजी झालेल्या ग्रामसभेत याबाबत ग्रामस्थांनी प्रश्न विचारला होता. अधिक माहिती जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडून मागवण्यात आली आहे. मात्र अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.
पी.डी.दिवकर, ग्रामसेवक
गावातील पाणीपुरवठा सुरळीत सुरु आहे. मात्र गावकीने लाईटचे बील न भरल्याने लाईन कट केली आहे. 48 नळ कनेक्शन हे नवीन पाईपलाईनवर शिफ्ट करायचे राहीले आहे. सबंधीताने तसे पत्र देणे आवश्यक आहे. या योजनेत भ्रष्टाचार वगैर झालेला नाही.
निलेश चवरकर, अभियंता