। पनवेल । वार्ताहर ।
दुबई येथे वेगवेगळ्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून एका भामट्याने पनवेल परिसरातील तक्का परिसरात राहणाऱ्या महिलेची तब्बल 43 लाख 41 हजार 350 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हमझा रमकडाचाला रा. दुबई याच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसनीम टोपीवाला असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे, त्यांनी जून 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत हमझा याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दुबई येथे वेगवेगळ्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तसनीम यांनी बँक खात्यातून हमझा याने व्हॉट्सॲपवर पाठवलेल्या विविध खात्यात 43 लाख 41 हजार 350 रुपये पाठवून दिले. ही रक्कम पाठवल्यानंतर हमझा याने त्यांना नफा देणे तर दूरच राहिले तसनीम यांनी गुंतवणूक केलेली रक्कमही दिली नाही. याबाबत त्यांनी हमझा याला फोन करून तसेच मेसेज पाठवूनही तो याकडे दुर्लक्ष करू लागला. या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तसनीम यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
दुबई येथे गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची लाखोंची फसवणूक
