स्व. प्रमोद ठाकूर यांची शोकसभा संपन्न
| भाकरवड | वार्ताहर |
स्व. प्रमोद ठाकूर यांच्या जाण्याने समाजाच्या हितासाठी सतत धडपडणार्या निष्ठावंत कार्यकर्त्याला आपण मुकलो असून, त्यांच्या जाण्याने शेतकरी कामगार पक्षाची कधीही न भरुन येणारी अशी हानी झाली आहे. कुसुंबळे ते वाघविरा रस्ता होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सामाजिक बांधिलकी जपणारा कार्यकर्ता आम्ही गमावल्याचे दुःख आहे, अशा शब्दात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आ. जयंत पाटील यांनी स्व. प्रमोद ठाकूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. शेकापच्यावतीने कुसंबळे येथे रविवारी (दि. 5) शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयंत पाटील बोलत होते.
अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे येथील अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद केशव ठाकूर यांचे गुरूवारी (दि. 26 डिसें.2024) राहत्या घरी हृदयिकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृतात्म्यास चिरशांती मिळावी यासाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली तसेच शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाई जयंत पाटील यांच्यासह अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्ष सुप्रिया पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील, शेकाप नेते नृपाल पाटील, अनिल गोमा पाटील, ज्येष्ठ नागरिक संघटना कुसुंबळे अध्यक्ष अमृत पाटील गुरुजी, पत्रकार प्रकाश म्हात्रे, माजी सरपंच विलास म्हात्रे, संगीता म्हात्रे, माजी सरपंच नरेश म्हात्रे, जीवन नीळकर, वैभव पिंगळे, मच्छिंद्र पिंगळे, मोहन धुमाळ, ज.का. ठाकूर गुरुजी, दत्ताराम पाटील, मच्छिंद्र पाटील हेंमनगर, कमला म्हात्रे, दिगंबर म्हात्रे, शैलेश पाटील कोलघर, तसेच विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक, क्रीडा आदी क्षेत्रातील तीनशेहून अधिक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अॅड. मानसी म्हात्रे यांनी प्रमोद ठाकूर यांच्याबद्दल आदरयुक्त भाव व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होऊन लग्नकार्यात काही बाकी तयारी झाली की नाही याची ते घरात जाऊन चौकशी करुन मदतकार्य करत असत. यावेळी मॉर्निंग वॉक ग्रुप, ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थ कुसुंबळे, नवरात्र उत्सव मंडळ, भजन मंडळ कुसुंबळे, आदींनी स्व. ठाकूर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
स्व. प्रमोद ठाकूर यांनी गेल्या अनेक वर्षे शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून कार्य केले. त्यांनी सदस्य, सरपंच, सभापती अशा पदांवर काम केले. अत्यंत हुशार, प्रामाणिक, सदा मितभाषी असा त्यांचा स्वभाव होता. त्यांनी सामाजिक, क्रीडा, राजकीय अशा अनेक क्षेत्रात चांगली कामगिरी केली. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार म्हणून कार्यरत होते. ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबळे सरपंचपदावर 20 वर्षे विराजमान होऊन गावातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रात नावीन्यपूर्ण कामगिरी बजावून समाजाचे हित साधल्याचे उपस्थितांनी आपल्या भाषणातून नमूद करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
आठवणींना उजाळा देणार
स्व. प्रमोद ठाकूर यांनी अगदी कमी कालावधीत राजकीय, सामाजिक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. त्यांना पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी खंबीरपणे पार पाडून या विभागाचा आपल्या कर्तृत्वाने कायापालट केला आहे. म्हणूनच त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी प्रमोद ठाकूर यांच्या नावाने ओळखले जाईल असे कार्य आपण या विभागात करू, तसेच संपूर्ण पाटील कुटुंब ठाकूर परिवाराच्या पाठीशी आहोत, अशी ग्वाही दिली.