| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत येथील बिरदोले या गावात तरुणाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी (दि.26) घडली आहे. उल्हास नदी जवळ शेती असल्याने रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे नदीला पुर आला होता. या पुरामध्ये शेतीचे कोणते नुकसान झाले आहे हे पाहण्यासाठी हा तरुण गेला असताना ही दुर्घटना घडली. रोशन कचरू कालेकर (27) असे तरुणाचे नाव आहे.

नेरळ- कळंब रस्त्यावरील बिरदोले या गावाच्या मागील बाजूने उल्हास नदी वाहते. रात्री सर्वत्र ढग फुटी सदृश पाऊस झाल्याने उल्हास नदीला अचानक पूर आला. आज पहाटे सर्वांना जाग आली ती विजांचा लखलखाट आणि ढगांचा गडगडाट यातून जाग आली. त्यावेळी प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू होता. त्यामुळे गावाच्या कडेला उल्हास नदीला आलेल्या पुराचे पाणी आपल्या शेतात आल्याने आणि त्यातून शेतीचे किती नुकसान झाले आहे हे पाहण्यासाठी रोशन कालेकर हा तरुण सकाळी सात वाजता छत्री घेऊन घरातून बाहेर पडला होता. त्यावेळी देखील आकाशात वीजा चमकत होत्या आणि ढग गडगडत होते. मात्र, तरी देखील शेती पाहण्यासाठी गेलेला रोशन पुन्हा घरी परत आला नाही. नेरळ ग्रामस्थ व नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी रोशन कालेकर या तरुणाचा मृतदेह शविच्छेदन करण्यासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. या घटनेने पंचक्रोशीत शोककळा कोसळली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे