| मुंबई | प्रतिनिधी |
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी रेल्वे स्थानक ते भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मस्जिद स्थानकावर पाणी साचल्यामुळे सकाळी 10:25 वाजेपासून भायखळा – सीएसएमटी दरम्यान लोकल सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे रेल्वे एका जागी उभ्या असल्याने प्रवाशांनी वाट काढत जवळील स्टेशन गाठलं आहे तर काही रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. आज आठवड्याचा पहिलाच दिवस असून, मुंबईतील पावसाने मुंबईकरांची मोठी दाणादाण उडवून दिली आहे. चुनाभट्टी आणि सायन दरम्यान पाणी भरल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकची सेवा ठप्प झाली असून मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवांवर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे.