| रसायनी | वार्ताहार |
हवामान खात्याने रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. सोमवारी (दि.26) रोजी पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मोहोपाडा रसायनी पाताळगंगा परिसरात मूसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोहोपाडा व रसायनी परिसरातील रस्ते पाण्याने तुडूंब भरल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. लोहोप जवळ रस्त्यावर वृक्ष कोलमडून पडल्याने काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती. पाताळगंगा नदीही दुथडी भरुन वाहत आहे.
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर मोहोपाडा रसायनी हद्दीत किलोमीटर 14/100 पुण्याकडे जाणा-या रस्त्यावर मुसळधार पावसामुळे डोंगराची दरड कोसळली. त्यामुळे दगड व माती दुस-या व तिस-या लाईनवर आल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. यावेळी आयआरबी, देवदूत यंत्रणा यांनी दुस-या व तिस-या लाईनवर सेफ्टी कोन लावून बंद ठेवून पहिली लाईन वाहतुकीस चालू ठेवली आहे. या घटनेची माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच युध्दपातळीवर काम सुरु करुन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.