| मुंबई | प्रतिनिधी |
मोबाईल घेऊन पळून गेल्याच्या रागातून दोघांमध्ये झालेल्या हाणामारीत 30 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना साकीनाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पिता-पुत्राला अटक केली आहे. अशोक तुळसे (30) असे मृत तरूणाचे नाव आहे. तो साकीनाका येथील अशोक नगर परिसरातील रहिवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक तुळशे हा आरोपी सुरेश भगवान दुनघव यांचा मोबाईल घेऊन पळून गेला होता. त्यामुळे संतापलेल्या सुरेश व त्याचा मुलगा लक्ष्मण दुनघव यांनी त्याला साकीनाका येथील काजूपाडा परिसरात गाठले. त्यानंतर त्यांनी लाथा-बुक्क्यांनी अशोक तुळशेला मारहाण केली. त्यावेळी त्यांनी त्याला रस्त्यावर ढकलून दिले. त्यामुळे त्याच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली आणि अशोक बेशुद्ध झाला. स्थानिकांच्या मदतीने त्याला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकणी मृत अशोक तुळशे याचा भाऊ आकाश तुळशे (24) याने पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्याच्या तक्रारीवरून साकीनाका पोलिसांनी पिता-पुुत्र सुरेश व लक्ष्मणविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. सुरेशचा मोबाइल घेऊन पळून गेल्याच्या रागातून सुरेश व त्याचा मुलगा लक्ष्मण याने अशोकला मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून आरोपींचा शोध घेतला. त्या दोघांनाही अशोक नगर परिसरातून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.