आपले सरकार सेवा केंद्र सुरू
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन येथे नगरपरिषद इमारतनजीक ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू झाले आहे. या केंद्रामुळे विविध शासकीय दाखल्यांसाठी नागरिकांना व विद्यार्ध्यांना शासकीय कार्यालयांत हेलपाटे मारावे लागणार नाहीत. एकाच ठिकाणी सर्व महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने दिव्यांग व्यक्ती, नागरिक व विद्यार्थी समाधान व्यक्त करीत आहेत.
सध्या शैक्षणिक प्रवेशाचा काळ सुरू असून विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, राष्ट्रीयत्व आणि उत्पन्नाचा दाखला अशा विविध कागदपत्रांची तातडीने गरज असते. या अगोदर कामांसाठी विद्यार्थ्यांना व पालकांना तहसील कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत असत. मात्र, आता हे केंद्र शहरातच सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी केवायसी करीता तसेच नागरिक व महिलांकरिता हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, नवीन रेशनकार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड अपडेट आणि शेतीविषयक 7/12 व 8-अ चे उतारे यांसारख्या अनेक सेवा येथे जलद गतीने मिळणार आहेत.
