आपले सरकार सेवा केंद्र सुरू
। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठण्याजवळील कानसई येथील रहिवासी प्रज्ञा हारपाल संचलित व मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या ऐनघर फाटा येथील मे. हारपाल एंटरप्रायजेसच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर श्रीमती शशिकला हारपाल यांच्या हस्ते फीत कापून घरगुती वातावरणात करण्यात आले. शासनाचे अधिकृत सेवा केंद्र सुरु झाल्याने येथील ऐनघर, सुकेळी परिसरातील नागरिकांची विविध शासकीय दाखले व इतर आवश्यक त्या कागदपत्रांसाठी होणारी गैरसोय दूर होणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमाला कानसई गावातील ज्येष्ठ नागरिक काशिराम ढाणे, ऐनघर उपसरपंच रोहिदास लाड, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी एम.एन. बायवार, रामचंद्र जवके, संतोष लाड, अॅड. शंकर हारपाल आदींसह महामार्ग पोलीस कर्मचारी व इतर नागरिक यावेळी उपस्थित होते. ऐनघर भागात हे आपले सेवा केंद्र सुरु झाल्याने पंचक्रोशी मधील नागरिक, पालक व विद्यार्थी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.