पनवेल सत्र न्यायालयाचा मोठा निकाल
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
2016 साली घडलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.जी. पांडेवाल यांनी दिलेल्या निकालानुसार अभय कुरुंदकर हाच मुख्य दोषी असल्याचे म्हटले आहे. तो कलम 302 अंतर्गत दोषी आढळला आहे.
महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सहभागी असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तर, आरोपी राजू पाटील याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 11 एप्रिल रोजी होणार आहे. अश्विनी ब्रिदे 11 एप्रिल 2016 रोजी बेपत्ता झाल्या होत्या. घटनेच्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास त्या अभय कुरूंदकरला भेटायला पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. यानंतर अभय कुरूंदकर हे बिद्रे यांना कारमध्ये घेऊन भाईंदरच्या दिशेने रवाना झाला. याचवेळी कारमध्येच कुरूंदकरने बिद्रे यांची गळा दाबून हत्या केली. त्यावेळी त्याच्यासमवेत महेश फळणीकर असल्याचेदेखील समोर आले होते. ही घटना 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 6.41 ते रात्री 11.11 च्या दरम्यान घडली. त्यानंतर रात्री 11.18 वाजता बिद्रे यांचा मोबाईल बंद झाला. हत्या केल्यानंतर आरोपीने लाकडे कापायच्या कटरने अश्विनी यांच्या शरीराचे तुकडे केले. कुरूंदकर आणि फळणीकरने राजू पाटील आणि खासगी चालकाला सोबत घेत मध्यरात्री अश्विनी बिद्रेचे तुकडे कारमधून वसईच्या खाडीत फेकले.
अश्विनी बिद्रे यांची हत्या नेमकी कशामुळे झाली?
अश्विनी बिद्रे या 2005 मध्ये पोलीस दलात रुजू झाल्या होत्या. त्या सांगलीत पोस्टिंग असताना मुख्य आरोपी अभय कुरुंदकरशी त्यांची ओळख झाली होती. दोघंही विवाहित असून, दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अश्विनी बिद्रे आणि अभय कुरूंदकर दोघांनाही मुलं होती. कुरूंदकरने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन बिद्रे यांच्यासोबत लग्न करण्याचे वचन दिले. त्यामुळे अश्विनी यांनी पती राजू गोरे यांच्यासोबतचे संबंध तोडले. अश्विनीला राजू गोरेपासून एक मुलगी आहे. जी आपल्या पित्याकडे राहते.
पतीपासून वेगळे झाल्यानंतर अश्विनी यांनी अभय कुरूंदकरकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र, कुरूंदकरला अश्विनीशी लग्न करायचे नव्हते. त्यावरुनच कुरुंदकर आणि बिद्रे यांच्यात रोजच भांडणे होऊ लागली. मात्र, कुरूंदकर पहिल्या पत्नीला व मुलांना सोडू शकत नव्हता. त्यामुळे त्याने अश्विनीची हत्या करण्याचा डाव रचला. यासाठी त्याने बालपणीचा मित्र महेश फळणीकर याला सोबत घेतले आणि अश्विनीची हत्या केली. या प्रकरणात या दोघांना राजू पाटील आणि कारचालक कुंदन भांडारी यांनी साथ दिली.
अभय कुरूंदकरने अश्विनी बिद्रेचे अपहरण करून धावत्या गाडीत गळा दाबून अश्विनीची हत्या केली. त्यानंतर महेश फळणीकर आणि राजू पाटीलच्या मदतीने मृतदेह वसई-भाईंदरच्या खाडीत फेकत विल्हेवाट लावली. अश्विनी बिद्रे यांची हत्या केली त्यावेळी अभय कुरुंदकर ठाणे ग्रामीण येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता.