खासदार शरद पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती
| अलिबाग | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस, माजी आ. जयंत पाटील यांचा सोमवारी (दि. 7) सकाळी दहा वाजता अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात हा सोहळा होणार आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी ‘जयंतभाई पाटील अभिष्टचिंतन सोहळा समिती’च्यावतीने करण्यात आली आहे. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यासाठी देशाचे माजी संरक्षण मंत्री तथा विद्यमान खासदार, राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
यावेळी खासदार निलेश लंके, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ. बाबासाहेब देशमुख, आ. नारायण पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप राज्य सोशल मीडिया अध्यक्षा तथा प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप खजिनदार अतुल म्हात्रे, शेकाप कामगार आघाडीचे प्रमुख प्रदीप नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, द्वारकानाथ नाईक, जिल्हा, तालुका चिटणीस मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, वेगवेगळ्या आघाडींचे पदाधिकारी, सदस्य, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समितीचे माजी पदाधिकारी, सदस्य, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रांतील पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.
शरद पवार यांचे पेझारी येथे आगमन झाल्यावर शेकापच्या कार्यकर्त्यांकडून पेझारी नाका येथे जल्लोषात स्वागत केले जाईल. त्यानंतर शरद पवार यांचे पीएनपी नाट्यगृह येथे आगमन होताच स्वागत समारंभ होणार आहे. शरद पवार यांच्या हस्ते पीएनपी नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ केला जाईल. शेकापचे नेते जयंत पाटील यांचा यावेळी अभिष्टचिंतन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक उपक्रमांसह वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवून जिल्ह्यात जयंत पाटील यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे.
पीएनपी नाट्यगृहाचा शुभारंभ
अलिबाग तालुक्यातील सांस्कृतिक केंद्र असणारे पीएनपी सहकारी सांस्कृतिक कला विकास मंडळ म्हणजेच पीएनपी नाट्यगृहाला 15 जून 2022 रोजी भीषण आग लागून दुर्घटना घडली. अनेक नाट्यरसिकांची मोठी निराशा झाली होती. नाट्यगृह पुन्हा उभे करण्यासाठी शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील, संस्थेच्या अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांनी प्रचंड मेहनत घेतली. अखेर कलाकारांसाठी पीएनपी नाट्यगृह पुन्हा उभे राहिले. सोमवारी (दि. 7) जुलै रोजी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचा शुभारंभ होणार आहे. तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अलिबागसह जिल्ह्यातील कलाकारांना, नाट्य रसिकांना हक्काचे व्यासपीठ खुले होणार आहे. सर्व अत्याधुनिक सर्व सोयी-सुविधांयुक्त असणारे नाट्यगृह उभारण्यात आले आहे. वातानुकूलित आधुनिक तंत्रज्ञान, जेबीएल साऊंड सिस्टीमचा वापर करून सुसज्ज आसन व्यवस्था, मुबलक पार्किंग व्यवस्था आहे. नाट्यगृहाचे दर अन्य नाट्यगृहांप्रमाणेच सर्वसामान्यांना परवडतील असे असणार आहेत. स्थानिकांना दरामध्ये विशेष सवलत दिली जाणार आहे. नाट्यगृहातील ॲड. नाना लिमये रंगमंचावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून स्थानिक कलाकारांना संधी दिली जाणार आहे.