डॉक्टर महिलेवर अत्याचार; प्रियकराकडून फसवणूक

| मुंबई | प्रतिनिधी |

डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार करून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. बदनामीची भीती दाखवून विवाहित प्रियकराने आतापर्यंत एक कोटी रुपये उकळल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अवैझ ताझिम अहमद या प्रियकराविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (दि.21) फसवणुकीसह लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तक्रारदार महिला ही कुर्ला येथे राहते. दोन वर्षांपूर्वी तिची सोशल मीडियावरून अवैझ याच्याशी मैत्री झाली होती. त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केले होते. ती विवाहित असून एक मुलगी असल्याचे त्याला माहीत होती. लग्नाच्या भूलथापा देऊन त्याने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले होते. काही महिने सर्व सुरळीत सुरू असताना, तो तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत होता. त्यानंतर दोघांच्या संबंधाविषयीची माहिती नातेवाईक, मित्रमंडळींना देण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करत होता. या धमकीनंतर त्याने तिच्याकडून एक कोटी रुपये उकळले होते. याचदरम्यान तिला अवैझ हा विवाहित असून त्याने केवळ शारीरिक संबंधासाठी तिचा वापर केल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत तक्रार केली होती. या घटनेचा एमआयडीसी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Exit mobile version