सायकलच्या चाकातून शिक्षणाला गती- चित्रलेखा पाटील

खानाव, बामणगाव, सत्यवाडीमधील 157 मुलींना मोफत सायकल

। अलिबाग । प्रतिनिधी ।

स्व. नारायण नागू पाटील, स्व. प्रभाकर पाटील, स्व. दत्ता पाटील या नेत्यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाची दारे खुली केली. त्यांचा हा वारसा जपण्याचा प्रयत्न माजी आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनातून केला जात आहे. मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला पाहिजे यासाठी गावे, वाड्यांमधील शाळकरी मुलींसाठी सायकली देण्याचा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमातून मुलींच्या चेहर्‍यावर हसू आणण्याचे काम केले आहे. सायकलीतून मुलींच्या शिक्षणाला गती देण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी बुधवारी (दि.2) केले. अलिबाग तालुक्यातील खानाव, बामणगाव ग्रामपंचायतीसह सत्यवाडी येथील गरीब, गरजू 157 मुलींना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम धसाडे कुणे येथे आयोजित केला होता. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या.

यावेळी गजानन पाटील, खानावचे सरपंच अजय नाईक, शेकाप पुरोगामी युवक तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, युक्ता गुजर, निधी पाटील, मनिषा म्हात्रे, विशाखा गायकर, काविरी मानकर, मेघा थळे, दिपा म्हात्रे, जागृती घरत, निकिता राऊत, मनिषा म्हात्रे, प्रणित पाटील, विजय गायकर, योगेश गुजर, जगदीश भगत, सुधाकर ठाकूर, सतीश भगत, अमित देशपांडे, महेंद्र विद्रे, मोहन धुमाळ, उत्तम रसाळ, मधुकर ढेबे, रामचंद्र मांडवकर, बाळाराम म्हात्रे, लक्ष्मण पवार, सेवानिवृत्त शिक्षक रवींद्र धसाडे, शत्रुग्न ठाकूर, गंगाराम धसाडे, राजेश टोपले, महेश म्हात्रे, महादेव पारधी, सतीश म्हात्रे, दिनेश धसाडे, तुलशीराम धसाडे, राम थळे आदी मान्यवर, खानाव, बामणगाव व सत्यवाडी येथील विद्यार्थिनी, त्यांचे पालक, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी चित्रलेखा पाटील म्हणाल्या, शिक्षण हाच विकासाचा खरा पाया आहे. मुली शिकल्या पाहिजे, मुलींची शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे, ही शेतकरी कामगार पक्षाची ठाम भूमिका राहिली आहे. आजही समाजात मुलीला समानता दिली जात नाही. हे चित्र बदलण्यासाठी मुलींच्या शिक्षणावर भर देणे काळाची गरज आहे. मुलींची शैक्षणिक प्रगती झाल्यावर समाजात एक आमूलाग्र बदल होईल, असा विश्‍वास आहे. मुली वेगवेगळ्या क्षेत्रात आणखी सक्षमपणे उभ्या राहिल्यास एक वेगळी क्रांती निर्माण होईल. सावित्राबाई फुले यांनी अनेक संकटांवर मात करीत मुलींना शिकविण्याचे काम केले. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत ‘सावित्रीच्या लेकी’ या संकल्पनेतून मुलींसाठी सायकली देऊन त्यांची शैक्षणिक प्रगती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रायगडसह उस्मानाबाद, धुळे अशा अनेक ठिकाणी हजारो मुलींना सायकली वाटप केल्या आहेत, त्याचा आनंद आहे.

या भागात गेल कंपनीमार्फत प्रकल्प उभा राहात आहे. या प्रकल्पातून स्थानिकांना चांगला पगार मिळावा, महिलांना रोजगारनिर्मिती व्हावी, ही शेकापची भूमिका आहे. त्याचा फायदा खानाव, उसरसह परिसरातील अनेक गावांना झाला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी सोबत एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. खानावमध्ये एक वेगळी क्रांती घडविली.त्या क्रांतीला सलाम आहे.

चित्रलेखा पाटील

Exit mobile version