शेकापच्या माध्यमातून गावांच्या विकासाला गती

आक्षी, बेलकडे, बामणगाव ग्रामपंचायत इमारतींचे भूमीपूजन; शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थिती

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील आक्षी, बेलकडे व बामणगाव या तीन ग्रामपंचायत इमारतींच्या कामांचा भूमीपूजन सोहळा शुक्रवारी (दि.17) सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडला. शेकाप महाराष्ट्र राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतींचे बांधकाम होणार असून, यातून गावांच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे.

यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य तथा शेकाप ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, शेकापचे ज्येष्ठ नेते अनिल पाटील, अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, आक्षीच्या सरपंच रश्मी पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह अलिबाग पंचायत समितीचे माजी सदस्य, बेलकडे ग्रामपंचायत माजी सरपंच संजय पाटील, मंगेश पाटील, प्रफुल्ल कानिटकर, सुनील कानिटकर, विलास पाटील, सुमित पाटील, प्रणित पाटील, बामणगाव मा. उपसरपंच अमित थळे, लंकेश नागावकर, निखील पाटील, रंजित राऊत आदी पदाधिकारी, आक्षी, बेलकडे, बामणगाव येथील शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 / 6

सुरुवातीला आक्षी येथील ग्रामपंचायतीच्या इमारतीचे त्यानंतर आक्षी ते खारगल्ली या अंतर्गत रस्त्याच्या कामाचा भूमीपूजन करण्यात आले, तसेच बेलकडे व बामणगाव येथील ग्रामपंचायतीच्या इमारतींचे भूमीपूजन नारळ वाढवून करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, अलिबाग तालुक्याचा विकास हा शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून झाला आहे. शेकाप नेते मा. आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनातून विकासाची गंगा पोहोचविण्याचे काम केले जात आहे. आक्षी, बेलकडे व बामणगाव ग्रामपंचायत हद्दीतील गावांच्या विकासाला अधिक गती मिळावी, म्हणून शेकापच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सत्ता नसली, तरी शेतकरी कामगार पक्षाची एक वेगळी ताकद आजही आहे. शेकाप हा एक वेगळ्या विचाराचा पक्ष आहे. सर्वसामान्यांसह गोरगरीबांचे हित साधणारा पक्ष आहे. भूमीपुत्रांसह स्थानिकांचा विचार करणारा शेतकरी कामगार पक्ष आहे. विकास होत असताना स्थानिकांचे अस्तित्व टीकून राहिले पाहिजे, ही भूमिका शेकापची कायम राहिली आहे. पक्षाशी निष्ठा असणारे कार्यकर्ते आजही पक्षासह पाटील कुटुंबियांसोबत ठाम आहेत, त्याचा आनंद आहे. शेकापच्या लाल बावट्यावरचे प्रेम असेच कायम ठेवा, असे आवाहनही चित्रलेखा पाटील यांनी केल्या. यावेळी द्वारकानाथ नाईक व अनिल पाटील, संजय पाटील यांनीदेखील मार्गदर्शन केले.

Exit mobile version