मोबाईलवर पाहणे पडले महागात
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या पर्यटनस्थळी पर्यावरणपूरक ई-रिक्षा चालविण्यात येत आहेत. या ई-रिक्षांपैकी एका रिक्षाचे चालक हे प्रवासी वाहतूक करीत असताना स्वतःच्या मोबाईल फोनमध्ये काही न्याहाळत होता. परिणामी, ई-रिक्षा कलंडली आणि अपघात झाला, असा दावा त्यावेळी बाजूने जाणारे घोड्यावरील प्रवाशाने केला आहे. तर, ई-रिक्षा चालकाने घोडा समोर आला म्हणून रिक्षा रस्त्याच्या एका बाजूला कलंडली अशी बतावणी केली आहे.
माथेरान या पर्यटन स्थळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माथेरानमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ई रिक्षा चालविली जात आहेत. प्रवासी वाहतूक करीत असताना ई-रिक्षाचे रस्त्याच्या धक्क्याला चाक लागून अपघात होऊन रिक्षा पलटी झाली. त्यावेळी रिक्षामधून प्रवास करणार्या प्रवाशांना सुदैवाने कोणतीही दुखापत झाली. 19 सप्टेंबरला सकाळी 11.30 च्या सुमारास माथेरानमधील ई-रिक्षा पायलट प्रकल्पामधील ई-रिक्षा क्रमांक 16 ही रिक्षा माथेरान हुतात्मा स्मारक येथून दस्तुरी म्हणजे टॅक्सी स्टँडकडे निघाली होती. दरम्यान, गाडी चालवत असताना चालक हा मोबाईलवर बोलत होता. रिक्षामध्ये एक पुरुष, महिला आणि एक छोटा मुलगा होता. मोबाईलवर बोलत असल्यामुळे वेग समजला नाही. परिणामी, मायरा पॉईंटजवळील तयाब लॉजजवळ रिक्षा धक्क्याला लागल्यामुळे ती पलटी झाली.त्यावेळी ई-रिक्षामधील प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला.
त्या ठिकाणी समोरच बसलेले सीताराम कुंभार आणि संतोष पवार यांनी धाव घेऊन गाडी उभी करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आणखी दोघे, तिघे जण येऊन त्यांनी गाडी उभी केली. गाडीमध्ये बसलेल्या पर्यटकांनी सांगितले की, गाडीचा वेग जास्त होता. त्यात चालक हा मोबाईलवर बोलत होता. त्या पर्यटकाला किरकोळ दुखापत झाली असून, चालकाच्या डोक्याला मार लागला आहे. मात्र, या अपघातास रस्त्याने जाणारा घोडा जबाबदार आहे, असा आरोप रिक्षाचालकाने केल्याने या घटनेला वेगळे वळण लागले आहे.
परिवहन विभाग लक्ष देणार का?
या रिक्षा सुरू होण्यासाठी परिवहन विभागाने हिरवा कंदील दाखवला होता. त्यानंतर ई-रिक्षा सुरू झाल्या होत्या. पण, या ई-रिक्षा सुरू होऊन तीन महिने उलटूनसुद्धा परिवहन विभागाचे अधिकारी इकडे परीक्षणासाठी फिरकलेच नाहीत, त्यामुळे आतातरी परिवहन विभाग इकडे लक्ष देणार का? असा प्रश्न स्थानिकांसह पर्यटकांकडून विचारला जात आहे.