| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील चिरनेर गावात सार्वजनिक तसेच घरगुती साखरचौथ गणपतीची शनिवारी संकष्टी चतुर्थीला मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने प्रतिष्ठापना करण्यात येणार असून, येथील मूर्तिकार गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरविण्यात मग्न आहेत.
चिरनेर परिसरात साखर चौथ गणेशोत्सव विविध भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. साखरचौथ गणपतीच्या आगमनानंतर शनिवारी विधीपूर्वक श्रींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र भव्य मंडप उभारण्यात आले असून, विद्युत रोषणाईसह मनमोहक सजावट करण्यात आली आहे. दरम्यान, सार्वजनिक साखरचौथ गणेश उत्सव मंडळामध्ये श्रीराम सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ चिरनेर, श्री गावदेवी गणेश मित्र मंडळ आणि महिला मंडळ चिरनेर, विघ्नहर्ता सार्वजनिक साखरचौथ गणेशोत्सव कातळपाडा, अंकुश परदेशी मित्र मंडळ कातळपाडा, नवतरुण गणेश मंडळ कातळपाडा, कुंभारपाडा गणेशोत्सव चिरनेर, सार्वजनिक गणेश उत्सव रांजणपाडा तसेच अन्य मंडळाचा साखरचौथ गणेशोत्सवात सहभाग असल्याची माहिती गणेश उत्सव मंडळांकडून देण्यात आली. साखरचौथ गणेशोत्सव शांततेने, कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करून साजरा करण्याचे आवाहन उरण पोलीस प्रशासनाने केले असून, या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तयारीच्या दृष्टिकोनातून परिश्रम घेत आहेत.